समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे; आम्ही पूर्ण सहकार्य करतोय, क्रांती रेडकर यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 03:33 PM2023-05-15T15:33:10+5:302023-05-15T15:33:51+5:30
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपावर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: कॉर्डिलिया क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थ प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा ठपका ठेवत सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अन्य दोन अधिकारी, या प्रकरणातील पंच किरण गोसावी आणि अन्य काही जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
आर्यन खानची मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागितले होते, शेवटी १८ कोटींना डील पक्की झाली होती, असं सीबीआयनं आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. वानखेडेंच्या वतीनं किरण गोसावीनं ५० लाखांचं आगाऊ पेमेंटही घेतलं होतं, असाही आरोप सीबीआयनं केला आहे. समीर वानखेडेंना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. आपला जबाब नोंदवण्यासाठी त्यांना गुरुवारी, म्हणजेच १८ मे रोजी, नवी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपावर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. हे केवळ आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या कारवाईत पूर्ण सहकार्य करत आहोत, असं पत्नी क्रांती रेडकर यांनी सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत, असंही क्रांती रेडकरने यावेळी सांगितले.
Everyone knows that the allegations being levelled against him are wrong. These are just allegations and we are fully cooperating in the CBI proceedings. We have faith in law and order, and we are ready to cooperate with the investigating agency as a responsible citizen: Kranti… https://t.co/tBUZK1Opkcpic.twitter.com/veeCvVFrIt
— ANI (@ANI) May 15, 2023
दरम्यान, सीबीआयने माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. माझ्या घरातून त्यांना १८ हजार रुपये रोकड आणि मालमत्तेची ४ कागदपत्रं सापडली आहे. संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळतेय, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला, पण त्यांना काहीही सापडलं नाही, असा दावाही समीर वानखेडे यांनी केला आहे.
प्रकरण काय?
- एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी असताना समीर वानखेडे यांनी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी कॉर्डिलिया क्रूझवर छापेमारी केली होती.
- क्रूझवरून अमली पदार्थांचा साठा जप्त करतानाच क्रूझवर जाणाऱ्या आर्यन यालाही अटक केली होती.
- आर्यनला अटक न करण्यासाठी वानखेडे आणि त्यांच्या पथकाने २५ कोटींची लाच मागितल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.
- क्रूझवरील कारवाईनंतर समीर वानखेडे हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आर्यन प्रकरणातही त्यांनी अनेक प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर होता.
- या प्रकरणी त्यांच्यासह एनसीबीच्या सात अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी झाली होती.
- यानंतर एनसीबीने सीबीआयला पत्र लिहून वानखेडे व त्यांच्या पथकातील लोकांची भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी करण्यास सांगितले होते.
- कूझ प्रकरणी आर्यन खान याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मे २०२२ मध्ये त्याची निर्दोष मुक्तता केली होती.