दुर्मीळ शस्त्र प्रदर्शनाने इतिहासप्रेमी भारावले
By admin | Published: March 20, 2017 02:24 AM2017-03-20T02:24:16+5:302017-03-20T02:24:16+5:30
भायखळ्यातील घोपडदेव परिसरात असलेल्या सुभाष लेन पटांगणात रविवारी इतिहासप्रेमींना शस्त्र प्रदर्शनाची मेजवानी मिळाली.
मुंबई : भायखळ्यातील घोपडदेव परिसरात असलेल्या सुभाष लेन पटांगणात रविवारी इतिहासप्रेमींना शस्त्र प्रदर्शनाची मेजवानी मिळाली. हिंदवी प्रतिष्ठान आयोजित या प्रदर्शनात ठेवलेल्या शिवकालीन, पेशवेकालीन आणि ब्रिटिश काळातील शस्त्रांच्या नजराण्याने इतिहासप्रेमींचे लक्ष वेधले.
लोकांना इतिहासाची माहिती मिळावी आणि प्रत्येक शस्त्रामागील शास्त्र कळावे, या मुख्य हेतूसाठी इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवल्याचे प्रतिष्ठानचे सचिव राहुल विचारे यांनी सांगितले. विचारे म्हणाले की, गिरणगावाला सांस्कृतिक परंपरेचा वारसाच लाभला आहे. तो जपण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने या प्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे. शस्त्र म्हटले की लोकांना केवळ मारामारीच वाटते. मात्र त्याचा वापर केवळ मारामारीसाठी न करता, त्यामागील शास्त्र, संस्कृती आणि इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे. प्रदर्शनाचे आयोजक नीलेश सकट यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांपासून दुर्मीळ इतिहासकालीन शस्त्रांचे संकलन करत आहे. सुमारे ३५० शस्त्रांचा साठा मिळवण्यात यश मिळाले आहे. या शस्त्रसाठ्याच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून २५० हून अधिक प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. प्रत्येक प्रदर्शनात युद्धनीती, शस्त्रांमागील शास्त्र सांगताना भविष्यात इतिहासाचे जतन कसे करता येईल, याची माहिती देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सकट यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)