वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला मिळणार झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 03:15 AM2019-02-13T03:15:47+5:302019-02-13T03:16:20+5:30
वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात येणार आहे. हेरिटेज दृष्ट्या ए-वन दर्जा असलेल्या या स्थानकाचे रूप पालटवण्याचे काम पुढील सहा ते आठ महिने सुरु राहणार आहे.
मुंबई : वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात येणार आहे. हेरिटेज दृष्ट्या ए-वन दर्जा असलेल्या या स्थानकाचे रूप पालटवण्याचे काम पुढील सहा ते आठ महिने सुरु राहणार आहे. वांद्रे स्थानक उपनगरीय मार्गावरील आकर्षिक स्थानक असल्याने या स्थानकाला ‘उपनगरीय राणी’ असे संबोधले जाते.
या स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी एकूण ७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. वांद्रे स्थानकाला लाकडी आसने, एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. यासह हेरिटेज वास्तूचे सौंदर्यीकरण वाढविण्यात येणार आहेत. कौलारू छताच्या देखाव्याला सुंदरता देण्यात येणार आहे. ऐतिहासिक नक्षी आणि ऐतिहासिक कामाला कोणताही धोका न पोहचविता काम करण्यात येणार आहे. दरवाजे, खिडक्या, प्रवेशद्वार यांची दुरूस्ती केली जाणार आहे, अशी माहिती हेरिटेजतज्ज्ञांनी दिली. वांद्रे स्थानक सुरू करण्याचा प्रस्ताव १८६४ साली मंजूर करण्यात आला. त्यानंतर १८६९ साली येथून लोकल सेवा सुरू झाली. वांद्रे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि फलाटाचे सुशोभिकरण करण्यात आले. हे काम १८८८ पर्यंत करण्यात आले. सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरणाच्या कामामुळे या वास्तूला १९९५ साली जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. २००८-०९ साली वांद्रे स्थानकाचे काम हाती घेतले होते. आता २०१९ मध्ये पुन्हा एकदा सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
खूप मोठा इतिहास लाभलेल्या वैभवशाली वांद्रे स्थानकाला जागतिक हेरिटेज- १ चा दर्जा आहे. या हेरिटेज स्थानकांची माहिती सर्व प्रवाशांना मिळावी, यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने ऐतिहासिक वांद्रे स्थानकात मंगळवारपासून ‘हेरिटेज उत्सव’ भरविण्यात आला आहे. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी पश्चिम रेल्वेचे वरीष्ठ यांत्रिक विभागाचे अभियंता ए. अग्रवाल, मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी केले.
मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, खूप मोठा ऐतिहासिक दर्जा प्राप्त आहे. या प्रदर्शनात अनेक ऐतिहासिक कलाकृती, माहिती फलक, ट्रेन मॉडेल, अनेक ऐतिहासिक छायाचित्रे, ऐतिहासिक दस्ताऐवज ठेवण्यात आला आहे. या स्थानकाला ऐतिहासिक दर्जा असल्याने या स्थानकाला ‘उपनगरीय राणी’ म्हणले जाते. वांद्रे स्थानकावर व्हिकोरिया गोथिक आणि वर्नाक्युलर, डोमेस्टिक शैलीचे मिश्रण आहे. या वास्तूची रचना आकर्षित करणारी असल्याने आनंदी वातावरण निर्माण होते.
या प्रदर्शनात ऐतिहासिक काळातील टेलिफोन, बेल, वाफेवर धावणाऱ्या इंजिनाचा वेग बघणारे यंत्र, जुने सिग्नल दिवे, डिझेलवर चालणारे इंजिनाचे मॉडेल, १९ व्या दशकातील वेगवेगळ््या प्रकारचे इंजिनाची छायाचित्रे, ऐतिहासिक पूल, पश्चिम रेल्वे मार्गावरील जुनी स्थानकाची छायाचित्रे लावण्यात आले आहेत. यासह वांद्रे स्थानकाच्या इमारतीचे मॉडेल उभारण्यात आले आहे़ हे मॉडेल सर्व प्रवाशांना आकर्षित करत होते. यासह लाकडी आसन ठेवण्यात आले आहे़ त्यामागे वांद्रे टर्मिनसचे जुने छायाचित्र लावण्यात आले आहेत. या ठिकाणाला खास प्रवाशांसाठी सेल्फी पाईंट करण्यात आला आहे. अनेक प्रवाशांनी येथील वस्तूचे छायाचित्रे आपल्या मोबाइल मध्ये कैद करून ठेवली आहेत. यासह प्रवाशांनी सेल्फी पाईंट येथे सेल्फी काढले आहेत. गुरुवारपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्व प्रवाशांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनातून वांद्रे स्थानकाचे जुने रूप दाखविण्यात आले आहे.