मुंबई : ब्रिटिश राजवटीतील मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणारे मुंबई शहरात मैला मैलावर रोवण्यात आलेले अंतर निर्देशक (मैलाचे दगड) महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाच्या प्रयत्नाने पुनर्स्थापित करण्याच्या कामाचा शुभारंभ महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते रविवारी आर्थर रोड नाका येथे पार पडला.
हेरिटेज सूचीमधील १५ मैलाच्या दगडांपैकी पाच ठिकाणाचे मैलाचे दगड नष्ट झाल्याचे निर्दशनास आले आहे. उर्वरित १० मैलाचे दगड रस्ते व पदपथांची उंची वाढल्यामुळे जमिनीत गाडले गेले. सदर १० दगडांपैकी एफ/ दक्षिण विभागाने डॉ. एस.ए. राव मार्गावरील मैलाचे दगडाचे जीर्णोद्धार केलेले आहे. ब्रिटिश राजवटीत मुंबई शहरात सेंट थॉमस कॅथड्रल चर्च, हाँर्निमल सर्कल, फोर्ट, मुंबई येथे शून्य मैल प्रमाणित करून तेथून प्रत्येक मैलावर अंतर निर्देशक (मैलाचे दगड) रोवण्यात आले होते.
त्याकाळी सर्व मुख्य रस्ते सेंट थॉमस चर्चपासून सुरु होत होते. त्याकाळी मुंबई शहरात फारच थोडे रस्ते होते. जनता या रस्त्यांवरून घोड्याने प्रवास करत असे. जनतेला सेंट थॉमस चर्चपासूनचे अंतर समजण्यासाठी हे मैलाचे दगड बसविण्यात आले होते. त्याकाळी मुंबईमध्ये टाऊन हॉल अथवा पोस्ट ऑफिस असे महत्त्वाची वास्तू शहराच्या दक्षिण टोकाला अस्तित्वात नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांनी सेंट थॉमस चर्च या मुंबईतील सर्वप्रथम अँग्लियन चर्च धार्मिक स्थळाची शून्य मैलासाठी निवड केली.