Join us

कूपर हॉस्पिटलमध्ये ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला दिमाखात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:07 AM

मुंबई : पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम येथील डॉ. आर. एन. कूपर हॉस्पिटलमध्ये ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला आज सकाळी ११.४५ ...

मुंबई : पश्चिम उपनगरातील विलेपार्ले पश्चिम येथील डॉ. आर. एन. कूपर हॉस्पिटलमध्ये ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला आज सकाळी ११.४५ वाजता दिमाखात सुरुवात झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत लसीकरण केंद्र शनिवारपासून सुरू झाले.

लसीकरणाच्या आधी या केंद्राबाहेर नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात येत होते. लसीकरण केंद्राच्या आत खास एक ते चार आणि पाच ते आठ असे लसीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. लस टोचल्यानंतर त्यांना सुमारे अर्धा तास निरीक्षण केंद्रात ठेवण्यात येत होते, लस घेतल्यानंतर काही त्रास झाला तर खास निरीक्षणालय कक्षाची सुविधाही येथे उपलब्ध करण्यात आली. मात्र शनिवारी या केंद्रात लस घेतल्यानंतर कोणालाही त्रास झाला नाही आणि पहिल्याच दिवशी येथील लसीकरण मोहीम यशस्वी झाली, असे येथील अधिष्ठाता डॉ. पिनाकीन गुज्जर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू होती, असे त्यांनी सांगितले.

एका व्यक्तीला इंजेक्शनची सुई टोचल्याप्रमाणे काही सेकंदांत हातावर येथे लस दिली जात होती. मात्र एका व्यक्तीला साधारण पाच मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे येथील चित्र होते.

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि त्यांची पत्नी डॉ. अनिला सावंत यांना प्रथम लसीकरणाचा मान मिळाला. तत्पूर्वी येथील लसीकरण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद‌्घाटनपर भाषणाचा स्क्रीनद्वारे उपस्थित मान्यवरांनी लाभ घेतला.

गेली १० महिने कोरोनाशी लढा देणाऱ्या ५०० कोविड योद‌्द्यांना प्रथम लस देण्यात आली. यामध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी, सफाई कामगार अशा प्रकारच्या कूपर हॉस्पिटलसह इतर ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात आली. एका वेळी चारजणांना लस घेता येईल, असे खास दोन कक्ष तयार करण्यात आले होते. लस घेतल्यानंतर त्यांना काही वेळ देखरेख कक्षात ठेवण्यात आले. त्यांना लस घेतल्याचा आनंद झाला होता; तर कोणालाही लस घेतल्यानंतर काही त्रास झाला नाही.

----------------------------