रे रोड स्थानकाच्या ढासळत आहेत ऐतिहासिक खुणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 01:56 AM2020-02-17T01:56:21+5:302020-02-17T01:56:39+5:30
हेरिटेज स्थानक; ‘अ’ श्रेणीतील स्थानक आता झाले भकास आणि विद्रूप; रेल्वे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
कुलदीप घायवट
मुंबई : रेल्वेच्या इतिहासात मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेले रे रोड स्थानक आता भकास झाले आहे. या स्थानकाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर असून या ऐतिहासिक वारसाकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. हार्बर मार्गावरील रे रोड स्थानक हे ब्रिटिशकालीन स्थानक आहे. ज्याप्रमाणे हेरिटेज स्थानकांच्या यादीत सीएसएमटी, भायखळा, वांद्रे, चर्चगेट ही स्थानके ‘अ’ श्रेणीत येतात, त्याप्रमाणे रे रोड स्थानक हेरिटेज स्थानकाच्या यादीत ‘अ’ श्रेणीत येते. मात्र इतर स्थानकांच्या तुलनेत या स्थानकाकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळेच स्थानकाच्या भिंती, रंग, गोदामाची जागा, जुने अवशेष विद्रूप झाले आहेत. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले, मध्य रेल्वे प्रशासन हेरिटेज स्थानक आणि वास्तू याबाबत सजग आहे. सीएसएमटीच्या हेरिटेज इमारतीचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेने ‘हेरिटेज गॅलरी’ सुरू केली आहे. तसेच रेल्वे परिसरातील हेरिटेज वास्तूला आणि इतर हेरिटेज स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
अन्यथा वास्तू नष्ट होतील
मुंबईमधील ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थानकांना वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन दिसून येत आहे. सीएसएमटी येथील हेरिटेज इमारतीच्या घुमटाची दुरवस्था, रे रोड स्थानकाकडे झालेले दुर्लक्ष, यावरून ही उदासीनता प्रकर्षाने जाणवते. तसेच भायखळा, वांद्रे स्थानकात संथ गतीने सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. ही स्थानके मोठ्या कल्पकवृत्तीने बनविण्यात आली. अशा वास्तू पुन्हा बांधता येणार नाहीत. उर्वरित स्थानके ही प्रवाशांच्या सोयीसाठी बांधली आहेत. यात सौंदर्यीकरण, नक्षी नाही. हेरिटेज स्थानके, वास्तूची देखभाल त्वरित केली पाहिजे. अन्यथा, वेळ गेल्यास हेरिटेज वास्तू नष्ट होऊ शकते.
- चेतन रायकर, वास्तू वारसातज्ज्ञ
हेरिटेज स्थानकांकडे
लक्ष दिलेच पाहिजे...
मुंबईतील हेरिटेज स्थानकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांच्या मदतीने त्या स्थानकांना पुन्हा जुन्या रूपात जिवंत करणे आवश्यक आहे. तेव्हाच मुंबईचा इतिहास सर्वांना ज्ञात होईल. मुंबईच्या विकासामध्ये रेल्वेचे खूप मोठे योगदान आहे. मुंबईमधील हेरिटेज स्थानकाकडे लक्ष दिलेच पाहिजे, असे संवर्धन वास्तुस्थापत्यतज्ज्ञ आभा लांबा यांनी सांगितले.
‘स्थानकातील व्यथा’
च्हेरिटेज स्थानकाच्या यादीत असूनही या वास्तूमधील अवशेष जपण्यासाठी खूप कमी प्रयत्न होत आहे.
च्स्थानकात अनेक कालावधीपासून अर्धवट बांधकामे उभी आहेत. या बांधकामाचे डेब्रिज स्थानकात पडून आहे.
च्इमारतीच्या भिंतीवर वनस्पती उगविल्या आहेत.
च्ऐतिहासिक वारसा असलेल्या भिंतीवर स्वच्छता मोहिमेची जाहिरात केलेली असताना भिंतीवर तंबाखूजन्य पदार्थ
थुंकलेले आहेत.
च्इमारतीच्या खिडक्या तुटक्या आणि भकास झाल्या आहेत. स्थानकाचे दगडावर कोरलेले नाव मिटले आहे. स्थानकातील लिफ्ट, तिकीट खिडक्या बंद आहेत.
रे रोड स्थानकाचा असा आहे इतिहास...
१२ डिसेंबर १९१० रोजी हे स्थानक सुरू झाले. या स्थानकाला १८८५ ते १८९० या काळात मुंबईचे गव्हर्नर असलेले डोनाल्ड मॅके म्हणजे ११ वे लॉर्ड रे यांचे नाव स्थानकाला दिले. रे रोड स्थानकाची इमारत ही बेसॉल्ट खडकापासून बनवली आहे. या इमारतीच्या बाहेरील बाजूस ‘रे रोड जीआयपीआर’ असे लिहिले होते. तर गेट क्रमांक दोनच्या इथे दगडावर ‘रे रोड’ लिहिलेले आहे. मात्र त्यावर रेल्वे प्रशासनाकडून पेंटिंग केलेले रे रोड असे लिहिले आहे.