शाळांच्या सहली जाणार ऐतिहासिक ठिकाणी
By admin | Published: May 21, 2017 03:11 AM2017-05-21T03:11:32+5:302017-05-21T03:11:32+5:30
शालेय सहलींसाठी वॉटर पार्क, मोठ्या बागा, रिसॉर्ट्स, प्राणिसंग्रहालय अशा ठिकाणांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांना आनंद मिळावा, मुलांवरचा ताण कमी व्हावा
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शालेय सहलींसाठी वॉटर पार्क, मोठ्या बागा, रिसॉर्ट्स, प्राणिसंग्रहालय अशा ठिकाणांची निवड केली जाते. विद्यार्थ्यांना आनंद मिळावा, मुलांवरचा ताण कमी व्हावा, म्हणून अशा ठिकाणांची निवड केली जाते, पण येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या सहली ऐतिहासिक ठिकाणी घेऊन जाण्याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणाऱ्या सहली ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी काढण्यात याव्यात, अशी विनंती पर्यटन विभागाने शालेय विभागाला केली होती. राज्यातील पर्यटन धोरणाला चालना मिळावी, यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतरच शालेय सहलींचे आयोजन ऐतिहासिक ठिकाणी करण्यात येण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व माध्यमाच्या, तसेच सर्व मंडळाशी संलग्नित शाळांतील इयत्ता ५ वी ते १० वीतील विद्यार्थ्यांच्या सहली ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळेल, भौगोलिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्या, अशा ठिकाणी काढण्यात येणार आहेत. त्यामुळे एका शैक्षणिक वर्षात एका शैक्षणिक सहलीचे अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे, पण या सहलीसाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही. सहलीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय पालक घेऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
याउलट प्रतिक्रिया फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन यांनी व्यक्त केली आहे. या शासन निर्णयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय काळजी घ्यावी, याविषयी उल्लेख नाही. त्याचा दर्जा निश्चित केलेला नाही. या सहलीतूनही शाळा पालकांना लुबाडू शकतात. या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
विभागाच्या या निर्णयाचे शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी स्वागत केले आहे. ग्रामीण भागातील सहली या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांना नवीन ठिकाणे कळतील. विद्यार्थ्यांना लागलेले रिसॉर्टचे वेड कमी होईल. त्यांना नवीन गोष्टी अनुभवता येतील, असे मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.