१९४६ च्या नाविक बंडाचा इतिहास मुंबईत झाला जिवंत
By Admin | Published: March 21, 2017 02:26 AM2017-03-21T02:26:50+5:302017-03-21T02:26:50+5:30
गेल्या सत्तर वर्षांत काहीशा दुर्लक्षिल्या गेलेल्या नौसैनिकांच्या उठावाचा इतिहास पुन्हा अनुभवण्याची संधी मुंबईत उपलब्ध झाली आहे.
मुंबई : गेल्या सत्तर वर्षांत काहीशा दुर्लक्षिल्या गेलेल्या नौसैनिकांच्या उठावाचा इतिहास पुन्हा अनुभवण्याची संधी मुंबईत उपलब्ध झाली आहे. आशिष राजाध्यक्ष आणि विवान सुंदरम या दिग्गज कलाकारांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘मिनिंग्स आॅफ फेल्ड अॅक्शन इन्सरेक्शन १९४६’ हा प्रकाश-ध्वनी कार्यक्रम आणि प्रदर्शन काळा घोडा भागातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
युद्धनौकेच्या प्रतिकृतीत उभारलेल्या छोटेखानी आसनांवर बसून ४० मिनिटांचा प्रकाश-ध्वनी कार्यक्रम अनुभवता येतो. बंडाच्या काळातील ब्रिटीश अधिकाऱ्यांतील आणि नौसैनिकांतील संवाद, नारायण सुर्वे- नामदेव ढसाळ या दिग्गजांच्या कविता आणि साथीला खिळवून ठेवणारी प्रकाशयोजना यामुळे ही ४० मिनिटे रसिकांना ७० वर्षे मागे घेऊन जातात. दर तासाला होणाऱ्या या कार्यक्रमासोबतच सभागृहात मांडलेले तत्कालीन टेलिग्राफ, पोलीस अहवाल आणि अन्य कागदपत्रे अधिक माहिती उपलब्ध करून देतात. भाष्य प्रकाशन आणि अन्य काही राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संस्थांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन २५ मार्चपर्यंत सकाळी १० ते सायं. ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. नौसैनिकांच्या उठावाचा इतिहास अनुभवण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन ‘भाष्य’चे संचालक महेश भारतीय यांनी केले आहे. (प्रतिनिधी)