मुंबई - भाजप हा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरुन, आता भाजप-सेना आमनेसामने आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांच्या जयंतीदिनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी, बोलताना भाजपवरही निशाणा साधला. त्यामुळे, भाजप-सेना शाब्दीक युद्ध रंगलं आहे. त्यातच, संजय राऊत यांनी सांगितलेल्या इतिहासावरुन भाजपने पलटवार केला आहे.
शिवसेना जन्म सन 1966 सालचा. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत यांचा जन्म सन 1961 साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो. आमचे दोन नगरसेवक कानिटकर आणि कोरडे हे 1957 साली मुंबईत निवडून आले, असा इतिहास भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितला आहे. तसेच, शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावरही प्रहार केलाय.
सन 1967 ला हशु अडवाणी चेंबूरमधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. तुमचे पहिले आमदार वामनराव महाडिक 1970 साली परळ मधून निवडून आले तेही आमच्या पाठींब्यावर. त्यामुळे उगाच सोईने इतिहास उगळू नका. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हिंदुत्ववाच्या विचारांसाठी युतीत "आम्ही गर्व से कहो" म्हणत होतो. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र या जाज्वल्य इतिहासाच्या फुलांचे निर्माल्य झाले वाटतेय!
इतिहासाचा अर्थ केवढा जाच्यात्याच्या समजूती एवढा!, असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली.