Join us

भीमा कोरेगावचा इतिहास आता इंग्रजीतही; द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’चे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 11:08 PM

या वेळी आठवले म्हणाले, कोणत्याही समाजाला आपल्या इतिहासाचे विस्मरण होऊन चालत नाही.

मुंबई : महाराष्ट्राच्या सर्व जातींच्या लढवय्या संस्कृतीच्या इतिहासावर, तसेच महार समाजाचा लष्करी इतिहास व भीमा कोरेगाव लढाईवर भाष्य करणाऱ्या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. विजय मोरे यांनी हे पुस्तक इंग्रजीत लिहिले आहे.

या वेळी आठवले म्हणाले, कोणत्याही समाजाला आपल्या इतिहासाचे विस्मरण होऊन चालत नाही. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर महार समाजाचे लष्करी कारवाईतील महत्त्व या पुस्तकामुळे पुन्हा एकदा अधोरेखित होण्यास मदत मिळेल. मोरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना व जिज्ञासूंना अधिक माहितीसाठी हे पुस्तक लाभदायक व माहितीपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चळवळीला जिवंत ठेवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकांमधून मिळणारी ऊर्जा अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे आठवले म्हणाले.

पुस्तकाचे लिखाण करण्यापूर्वी मोरे यांनी खेड्यापाड्यात जाऊन माहिती गोळा केली व संदर्भ अधिकाधिक अचूक होतील, याकडे लक्ष दिले. त्यामुळे या लढाईकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलेल व सत्य समाजासमोर येईल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे आयोजित केलेल्या अभिवादन सभेत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सीमा आठवले, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, राजा सरवदे, पप्पू कागदे, मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे उपस्थित होते.

या पुस्तकाच्या माध्यमातून भीमा कोरेगाव लढाईवर नवा प्रकाशझोत पडेल व अधिक माहिती मिळेल, असा विश्वास डॉ. मोरे यांनी व्यक्त केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून महार समाजाच्या लष्करी परिपूर्णतेवर व इतिहासावर प्रकाशझोत पडेल, असे मोरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवाई व त्या काळातील परिस्थितीवर या पुस्तकात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :रामदास आठवलेडॉ. बाबासाहेब आंबेडकर