मुंबईतील प्रसिध्द रेल्वे स्टेशनच्या नावांमागे हा आहे इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 05:33 PM2017-10-27T17:33:42+5:302017-10-27T17:36:49+5:30

आपली मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या रेल्वेच्या काही स्थानकांची नावं कशी पडली , हे जाणून घेणं गंमतीचं ठरेल.

This is the history of the famous railway station in Mumbai | मुंबईतील प्रसिध्द रेल्वे स्टेशनच्या नावांमागे हा आहे इतिहास

मुंबईतील प्रसिध्द रेल्वे स्टेशनच्या नावांमागे हा आहे इतिहास

googlenewsNext
ठळक मुद्दे मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांच्या नावांमागे एक इतिहास आहे. स्थानकांना ही नावे प्रचलित होण्यामागची कारणंही तशीच आहेत.संबंधित जागा ज्या गोष्टींमुळे प्रसिद्ध होत्या, त्या प्रसिद्ध नावाने त्या स्थानकांची नावं ठरवण्यात आली आहेत.

मुंबई- मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांच्या नावांमागे एक इतिहास आहे. स्थानकांना ही नावे प्रचलित होण्यामागची कारणंही तशीच आहेत. संबंधित जागा ज्या गोष्टींमुळे प्रसिद्ध होत्या, त्या प्रसिद्ध नावाने त्या स्थानकांची नावं ठरवण्यात आली आहेत.

चिंचपोकळी

१८७७ साली ब्रिटीशांनी बांधलेल्या चिंचपोकळी या रेल्वे स्थानकाचे नाव येथील वृक्षांमुळे पडले आहे. पूर्वी येथे मोठ्या प्रमाणात चिंचांची आणि सुपारीची झाडे होती. त्याचप्रमाणे पोफळीचेही झाड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे चिंचांची आणि पोफळीच्या नावाच्या एकत्रितपणाने या स्थानकाला चिंचपोकळी असं नाव पडलं आहे. या विभागांनाही वृक्षांची नावं देण्यात आलेली आहेत. उदा. पेरु कंपाऊंड, नारियल वाडी, अंजिर वाडी इत्यादी.

मस्जिद 

मध्य रेल्वेच्या हद्दीत येणारे दुसरे स्थानक म्हणजे मस्जिद स्थानक. या स्थानकाला पूर्वी जुनी मशिद म्हणूनही ओळखलं जायचं. १८७७ साली या स्थानक सुरु करण्यात आलं. मात्र मस्जिद हे नाव तसंच कायम राहिलं आहे.

कॉटन ग्रीन

हार्बर मार्गावर असलेल्या कॉटन ग्रीन परिसरात मोठ्या प्रमाणात कपड्यांचा व्यापार होत असे. या विभागात अनेक गिरण्याही होत्या. पूर्वी कुलाब्यापासून ते कॉटनग्रीनपर्यंत संपूर्णपणे गवताळ भाग होता. आता जिथे बुधवार पार्क आहे तेथे कॉटन एक्सचेंजची स्थापना झाली होती. पण कालांतराने कॉटन एक्सचेंज हे कॉटन ग्रीन येथे उभारलं गेलं. स्थानकाच्या अगदी विरुद्ध बाजूला असलेल्या एका भव्य इमारतीत कॉटन एक्सचेंजचं काम केलं जायचं. ही इमारत पूर्णपणे हिरव्या रंगाने रंगवलेली होती. त्यामुळेच या परिसराला कॉटन ग्रीन हे नाव पडलं आहे.

घाटकोपर

आता मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याने घाटकोपरमध्ये असलेले घाट नाहिसे झाले आहेत. पण काही वर्षांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाट होते. म्हणून या स्थानकाला घाटकोपर असं म्हटलं जातं.

विद्याविहार

सोमय्या विद्याविहार या कॉलेजच्या नावावरून या स्थानकाला विद्याविहार असं नाव दिलं गेलं आहे, असं म्हटलं जातं. घाटकोपर आणि कुर्ला स्थानकाच्या मध्ये हे स्थानक आहे. त्यामुळे दोन्ही दिशेने विद्यार्थी संख्या प्रचंड वाढत होती. म्हणून येथे नवं स्थानक करण्याची आवश्यकता होती, असं काही जाणकार सांगतात. विद्यार्थ्यांना सोयीस्कररित्या प्रवास करता यावा याकरताच विद्याविहार या स्थानकाची स्थापना करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स

नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचे नामकरण झाले. १६ एप्रिल १८५३ साली बांधलेल्या या स्थानकाचे आतापर्यंत चार वेळा नामकरण झाले आहे. १८५३ साली जेव्हा हे स्थानक बांधलं तेव्हा या स्थानकाचं नाव बोरीबंदर असं होतं. कारण हा विभाग पूर्णतः बोरी बंदर या नावानेच ओळखला जायचा. १८८८ पर्यंत या स्थानकाला बोरी बंदर म्हणूनच संबोधलं जायचं. त्यानंतर मात्र या स्थानकाचं नाव बदलण्यात आलं. राणी व्हिक्टोरीयाच्या डोल्डन ज्युबिलीच्या निमित्ताने या स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनल्स हे नाव देण्यात आले. त्यानंतर १९९६ साली या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव देण्यात आलं. मात्र हे नाव देताना केवळ छत्रपती शिवाजी टर्मिनस देण्यात आले होते. त्यामुळे काही राजकारण्यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं पुन्हा नामकरण करण्यात आलं. अशाप्रकारे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक असलेल्या या स्थानकाचे १८६३ पासून चार वेळा नामकरण करण्यात आले आहे.

Web Title: This is the history of the famous railway station in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.