Join us

वीजबिलांची संपूर्ण रक्कम भरून अख्खे गावच थकबाकीमुक्त करण्याचा घडला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:06 AM

मुंबई : वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली असून, नागपूर येथील एका गावाने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीचे चालू व ...

मुंबई : वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली असून, नागपूर येथील एका गावाने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीचे चालू व थकीत वीजबिलांची संपूर्ण रक्कम भरून अख्खे गावच थकबाकीमुक्त करण्याचा इतिहास घडविला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ६ गावांतील सर्व १३५ शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या थकबाकीचा भरणा करून संपूर्ण गावाला १०० टक्के थकबाकीमुक्त केले आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळवित आज पर्यंत ११ लाख ९६ हजार १८४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून १ हजार १६० कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. योजनेतील सहभागासोबतच ग्रामपंचायत, जिल्हा क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी ७७३ कोटींचा हक्काचा ६६ टक्के निधी शेतकऱी मिळविणार आहेत. २ लाख ८७ हजार ६४ शेतकऱ्यांनी चालू वीजबिलांसह सुधारित मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा करून कृषिपंपाच्या वीजबिलांतून १०० टक्के थकबाकीमुक्ती मिळविली आहे. मागील वर्षी १ एप्रिल २०२० पासून जमा होणाऱ्या वसुलीच्या रकमेची कृषी आकस्मिक निधी म्हणून स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. यात आतापर्यंत एकूण ११६० कोटी ३४ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यापैकी ६६ टक्के रक्कम म्हणजे ७७३ कोटी रुपयांचा निधी कृषी वीजयंत्रणेच्या विविध कामांसाठी आहे.

-----------------

- वीजबिलांच्या थकबाकी मुक्तीसाठी ओढ

- १२ लाख शेतकऱ्यांनी केला ११६० कोटींचा भरणा

- कृषी वीजयंत्रणेसाठी मिळविणार हक्काचा ७७३ कोटींचा निधी

-----------------

कुठे जमा झाला किती निधी

पुणे प्रादेशिक विभागात ४४१ कोटी ८ लाख

कोकण प्रादेशिक विभागामध्ये २२३ कोटी ९१ लाख

औरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये ९६ कोटी १६ लाख

नागपूर प्रादेशिक विभागामध्ये ६७ कोटी ३८ लाख