मुंबई - राज्यातील 25 गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाविरोधात विरोधकांकडून संतप्त भावना येऊ लागल्या आहेत. ज्या भूमीत शिवरायांचे, माँ साहेबांचे आणि संभाजी महाराजांचे पाय लागले त्या मातीत नंगानाच होऊ देणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून एक व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय तुघलकी आहे. मराठी माणसाचा इतिहास स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा आहे. ज्या इतिहासाचे धडे आम्ही गिरवले, ज्या इतिहासाने महाराष्ट्र घडवला, ज्या इतिहासाने महाराष्ट्र जगभरात गेला. या इतिहासाशी खेळू देणार नाही असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच इथली प्रत्येक माती डोक्याला लावतो. पक्षीय राजकारण नाही मात्र गडकिल्ले लग्नसभारंभासाठी नाहीत. जे पर्यटन आहे ते ज्यांना महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आहेत. ज्यांना शिवरायांबद्दल प्रेम नाही, इतिहासाची आदर नाही, पडलेल्या रक्ताचे दिलेल्या बलिदानाचा आदर नाही असं सरकार सत्तेत असल्याने ते असा निर्णय घेऊ शकतात. या निर्णयाला महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस विरोध करणार असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देणार आहे. हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 किल्ल्यांची निवड केली आहे. त्यामुळे हे किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर भाड्याने देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 25 किल्ले एमटीडीसी हॉटेल आणि हॉस्पिटीलिटी चेन्सना भाडेतत्वावर देणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय संतापजनक आणि निषेधार्थ आहे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? महाराज आणि मावळ्यांनी बलिदान देऊन जिंकलेले हे गडकिल्ले आंदन देणार का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे