मुंबई : २६/११ हल्ल्याच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्ताने राज्य पोलीस दल मुख्यालयातील भिंतीवर उभारलेले स्मारक सर्वांसाठी खुले होणार आहे. यात महाराष्ट्रातील शहीद झालेल्या ८०० अधिकारी आणि अंमलदारांचा इतिहास उलगडेल. यात १७ शहिदांवरील लघुपटांचाही समावेश आहे.
गेल्या सहा दशकांत दहशतवाद, नक्षलवाद, संघटित गुन्हेगारी, बचावकार्य, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी करताना ७९७ अधिकारी, अंमलदार शहीद झाले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहता यावी आणि त्यांच्या पराक्रमाची माहिती नागरिकांना मिळावी या उद्देशाने हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती आणि लघुपटांद्वारे सर्वोच्च बलिदान देताना पोलिसांची झुंज, शौर्य आणि नेमकी परिस्थिती याचा प्रसंग उभा करण्यात आला आहे. या स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर हे स्मारक सर्वांसाठी खुले होईल.१७ शहीद अधिकारी, अंमलदारांच्या कहाण्या निवडून त्यावर लघुपट तयार करण्यात आले. जेथे हे पोलीस शहीद झाले तेथेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मुलाखतीचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे यातून पोलिसांचे कार्य, त्यांची जबाबदारी, धडपड, बलिदान आणि कुटुंबीयांची भावना नागरिकांपर्यंत पाेहाेचू शकेल.
२६/११ निमित्त मुंबईत कडेकोट बंदोबस्त२६/११च्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे परिसरासह समुद्रकिनारी गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात आहेत.