Join us

मुंबई जीपीओ वास्तूचा इतिहास ई-पुस्तक रूपाने प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बिजापूर, कर्नाटक येथील गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास सांगणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बिजापूर, कर्नाटक येथील गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास सांगणाऱ्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी राजभवन येथे झाले. ‘डॉन अंडर द डोम’ या डिजिटल पुस्तकाच्या माध्यमातून एका ऐतिहासिक वास्तूचा इतिहास पुढे आणल्याबद्दल राज्यपालांनी लेखिका व मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांचे अभिनंदन केले.

आज १०८ वर्षांनंतरही पोस्टाचे मुख्यालय असलेली ही वास्तू जनतेच्या सेवेत तत्पर असल्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी आनंद व्यक्त केला.

पोस्ट ऑफिसचे मुख्यालय केवळ वारसा वास्तू नसून जनसामान्यांच्या जीवनाशी निगडित ती राष्ट्रीय संपदा असल्याचे राज्यपाल म्हणाले.

देशातील प्रत्येक व्यक्तीकडे पोस्टाच्या रम्य आठवणी आहेत, असे सांगून पोस्ट विभागाने अशा आठवणीदेखील पुस्तक रूपाने संकलित केल्यास त्यातून एक सुंदर महाकाव्य तयार होईल, अशी टिप्पणी राज्यपालांनी यावेळी केली.

सन १९१३ साली बांधून पूर्ण झालेल्या इंडो-सारसेनिक स्थापत्य शैलीतील जीपीओ इमारत वास्तुरचनाकार जॉन बेग व जॉर्ज विटेट यांनी डिझाइन केली होती. सन १९०४ साली इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली व १३ मार्च १९१३ रोजी जीपीओ इमारत बांधून पूर्ण झाली. इमारतीच्या बांधकामाला १८ लाख ९ हजार रुपये खर्च आल्याची माहिती स्वाती पांडे यांनी यावेळी दिली. यावेळी राज्याचे प्रधान पोस्ट मास्टर जनरल हरीशचंद्र अगरवाल व पुस्तकाच्या सहलेखिका ऑर्कीडा मुखर्जी उपस्थित होते.