Mumbai: प्लेगच्या भीतीने मुंबईतून इथे पळून आले लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:18 PM2023-09-11T12:18:27+5:302023-09-11T12:19:04+5:30

Mumbai: मुंबईत १८९६ मध्ये हाँगकाँगहून जहाजाने मुंबईत आलेल्या लोकांमुळे प्लेगची साथ आली आणि सारेच हादरून गेले. प्लेगने दोन वर्षांत सुमारे २० हजार मुंबईकरांचा बळी घेतला आणि तितकेच लोक मुंबई सोडून पळून गेले.

history of Mumbai: People fled here from Mumbai for fear of plague! | Mumbai: प्लेगच्या भीतीने मुंबईतून इथे पळून आले लोक!

Mumbai: प्लेगच्या भीतीने मुंबईतून इथे पळून आले लोक!

googlenewsNext

मुंबईत १८९६ मध्ये हाँगकाँगहून जहाजाने मुंबईत आलेल्या लोकांमुळे प्लेगची साथ आली आणि सारेच हादरून गेले. त्याआधी १८९१ साली झालेल्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या होती ८ लाख २० हजार; पण प्लेगने दोन वर्षांत सुमारे २० हजार मुंबईकरांचा बळी घेतला आणि तितकेच लोक मुंबई सोडून पळून गेले.

कुठे गेले ते पळून? बहुतांशी लोक गेले आताच्या उपनगरांत. तेव्हा ती मुंबईत नव्हतीच. वांद्र्याचे बरेच ख्रिश्चन कांदिवलीला आले. हे लोक मूळचे कुणबी होते. ते आकुर्ली नावाच्या गावात राहू लागले. त्या काळी कांदिवलीला डोंगर होते आणि खाडीही. वस्ती खूपच कमी होती. तेव्हा इथली हवा थंड होती. सुदैवाने प्लेग इथपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे हे सारे वाचले. पुढे हे लोक आकुर्ली सोडून पोईसर व चारकोपला येऊन स्थायिक झाले. चारकोप, बंदर पाखाडी कोळीवाडा, आकुर्ली, कांदिवली अशी छोटी गावं होती. मराठी बहुसंख्य. कोळी, आगरी, भंडारी व ख्रिस्तीही राहायचे इथं. भंडारी लोक प्रामुख्याने ताडी व माडीचा धंदा करीत. काही गुजरातीही राहत. कोळीवाड्यात हिंदू व ख्रिस्ती कोळी. प्लेगचा शिरकाव होऊ नये, म्हणून अनतोन सोज यानं तिथं एक क्रॉस उभारला.

कांदिवली रेल्वे स्टेशन आलं १९०७ ला. कांदिवली नाव कसं आलं, याविषयी अनेक कथा आहेत. ईस्ट इंडियन्स या गावाला कॉन्डोलिम म्हणायचे. स्थानिक लोक खांडोल म्हणायचे. तिथले डोंगर व दऱ्या यामुळे कॉन्डोल व्हॅली असं नाव होतं आणि त्याचा अपभ्रंश कांदिवली असा झाला, असंही सांगण्यात येतं. कांदिवलीच्या पूर्व भागात प्रामुख्याने जंगल व टेकड्या होत्या. त्यातील एक पारण टेकडी. त्या टेकडीतील माती व दगड यांचा शहरातील बांधकामासाठी वापर केला जात असे. कांदिवली व मालाड परिसरात दगडांच्या असंख्य खाणी होत्या.

n या कांदिवलीत पहिलं चर्च उभं राहिलं १६३० ला. त्याचं नाव अवर लेडी ऑफ अझम्पशन. 
n उपनगरातील हे पहिलं चर्च. ते आताच्या महात्मा गांधी मार्गावर आहे. करसांगली आकुर्ली मातेचं १५० वर्षांपूर्वीचं मंदिर आहे. 
n बंदरपाखाडी कोळीवाडा भागात १९०७ साली बांधलेलं होली क्रॉस चॅपेल आहे. 
n नंतरच्या काळात गुजराती समुदायाची वस्ती वाढली. त्यामुळे विविध मंदिरं व देरासरही आले. 

पाषाण युगात  मानवी वस्ती 
- आता पार गजबजून गेलेल्या कांदिवलीमध्ये (तेव्हा या भागाला कशालाही नाव नव्हतं) पाषाण युगात मनुष्य वस्ती होती, असं संशोधनात आढळून आलं आहे. 
- त्या काळातील मानव दगडाच्या हत्यारांचाच वापर शिकार किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी करत असे. ही हत्यारे त्यालाच बनवावी लागत. त्या काळातील मानवाने तयार केलेली हत्यारे खोदकाम आणि संशोधनात आढळून आली आहेत. 
- ही सुमारे १० ते १५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कांदिवली व आसपासच्या भागावर काही काळ मौर्य साम्राज्य होतं. बोरिवली ते जोगेश्वरीदरम्यानच्या बौद्धकालीन गुंफा व लेण्या हे त्याचंच निदर्शक म्हणता येईल.

Web Title: history of Mumbai: People fled here from Mumbai for fear of plague!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.