चर्रररर....सिझलर्स! 

By मनोज गडनीस | Published: October 3, 2022 09:32 AM2022-10-03T09:32:28+5:302022-10-03T09:33:00+5:30

एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा आवर्जून खाण्यासारखा हा एक अत्यंत रंजक पदार्थ आहे. 

history of sizzlers and journey in indian hotels | चर्रररर....सिझलर्स! 

चर्रररर....सिझलर्स! 

googlenewsNext

- मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

काहीतरी चमचमीत खावेसे वाटते, पण ते हेल्दी असेल का? या प्रश्नाचा भुंगा जेव्हा मनात सुरू होतो तेव्हा छानशा हॉटेलमध्ये जायचे आणि फारसा विचार न करता चर्ररर करत पुढ्यात येणारे गरमागरम सिझलर्स खायचे. लोखंडाच्या तापत्या तव्यावर मजेत विसावलेल्या कोबीच्या पानाच्या उबदार गादीत भाऊगर्दी केलेल्या छानशा भाज्या, बाजूला फ्रेन्च फ्राईज, मूदभर भात किंवा नूडल्स आणि त्यावरून ओसंडू पाहणारा सिझलर सॉस... वाफांच्या धुक्यातून यातील एकेक जिन्नस डोळ्यासमोर दिसत जातो आणि मग एका प्लेटमध्ये यातील थोडे थोडे सारे घ्यायचे आणि ते एकामागून एक खात त्यांच्या एकत्र चवीचा आनंद घ्यायचा. 

मुंबईत अनेक हॉटेल्समध्ये हा पदार्थ उपलब्ध आहे. किंबहुना वीकांती चार-पाच मित्रांचा अड्डा जमवून जेव्हा धम्माल सुरू असते तेव्हा सर्वांना एकावेळी खाता येणारा आणि सर्वानुमते मिळणाऱ्या पदार्थांच्या यादीत सिझलर्सचे नाव अग्रक्रमाने येते. मुंबईत तर काही हॉटेल्स ही फक्त आणि फक्त सिझलर्सचीच विक्री करतात. एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा आवर्जून खाण्यासारखा हा एक अत्यंत रंजक पदार्थ आहे. 

ऐतिहासिकदृष्ट्या हा पदार्थ फार पुरातन नाही. याचा जन्म १९५८ साली अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे झाला. तेथील एका हॉटेलमधील शेफने एका वेगळ्या पदार्थासाठी तयार केलेला सॉस हा भाज्या, भात एकत्र करत त्यासोबत चाखून पाहिला आणि त्याची भन्नाट चव त्याला प्रचंड आवडली. मग त्याने हा पदार्थ आपल्या हॉटेलच्या मेन्यूत समाविष्ट केला.  पण लवकरच त्याच्या लक्षात आले की, ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर ते त्याला ती ऑर्डर मिळेपर्यंत आणि त्याने तो पदार्थ खाईपर्यंत बराच वेळ जातो. काही वेळा हॉटेलमधील वातानुकूलित यंत्रणेमुळे पदार्थ थंडदेखील लवकर होतो. त्यामुळे मग त्याने लोखडांच्या तापत्या प्लेटमध्ये कोबीच्या आवरणात भाज्या, फ्राईज, भात/नूडल्स आणि वरून सॉस अशी मांडणी करत तो सर्व्ह करण्यास सुरुवात केली. 

हा एकमेव पदार्थ असा आहे की, तो ऑर्डर केल्यानंतर आपल्यापर्यंत येतो तेव्हा बाजूच्या टेबलालाच नव्हे तर संपूर्ण हॉटेलला कळते की तुम्ही सिझलर्स ऑर्डर केले आहे. कारण त्याचा चर्ररर आवाज आणि घमघमत्या वाफा, यामुळे तो सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. जर एखाद्याने सिझलर्स ऑर्डर केले असतील तर ते पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते आणि मग पाठोपाठ सिझलर्सच्या दोन-चार तरी ऑर्डर येताना दिसतातच. काही पदार्थ खाण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नसते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: history of sizzlers and journey in indian hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.