Join us

चर्चेचे इतिवृत्तान्त पोलिसांकडे स्वाधीन

By admin | Published: October 13, 2015 3:41 AM

ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमुळे त्यांच्या आत्महत्येला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे : ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमुळे त्यांच्या आत्महत्येला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीनंतर, पोलिसांनी ठाणे महापालिकेकडे कॉसमॉससंदर्भात स्थायी समिती आणि महासभेत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेचे इतिवृत्तान्त मागितले होते. त्यानुसार, सोमवारी ते पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात गोल्डन गँगसह ते पालिका अधिकारी कोण, याबाबतच्या तपासाला हा भक्कम पुरावा होऊ शकतो, याची तपासणी आता पोलीस करणार आहेत.मृत्यूपूर्वी परमार यांनी लिहिलेल्या १६ पानी सुसाइड नोटमध्ये पालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि गोल्डन गँगचा त्यांनी उल्लेख केल्याने, या संदर्भात पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्यात एक बैठक झाली होती. काही महिन्यांपूर्वी परमार यांच्या कॉसमॉसच्या एका प्रकल्पावरून स्थायी समितीच्या चार ते पाच बैठकांमध्ये जोरदार चर्चा होऊन, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली होती, तसेच महासभेत अजेंड्यावर विषय नसतानाही काही सदस्यांनी याच मुद्द्याला हात घालून परमार यांच्या या प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी केली होती, परंतु आता याच बैठकीमध्ये झालेल्या चर्चेचे इतिवृत्तान्त ठाणे पोलिसांनी पालिकेकडे मागितले होते. त्यानुसार, सोमवारी पालिकेने स्थायी आणि महासभेत झालेल्या त्या प्रत्येक चर्चेचे इतिवृत्तान्त सादर केले आहे. पोलीस आता त्याची सविस्तर तपासणी करणार असून, यातून काही धागेदोरे सापडतात का, याची चाचपणी करणार आहेत.