Worli Hit And Run : वरळीत काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास भरधाव ऑडी कारने धडक दिल्याने कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाला काही दिवस झाले असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळीमध्ये पुन्हा एकदा एका व्यावसायिकाच्या आलिशान गाडीने बाईकला धडक दिली आणि यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. विनोद लाड (२८) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. कावेरी नाखवा यांच्यासोबत अपघाताची घटना घडली तिथून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.
२० जुलै रौजी कामावरून घरी परतत असताना विनोदच्या बाईकला व्यावसायिकाच्या बीएमडब्ल्यने मागून जोरदार धडक दिली होती. या धडकेत विनोद खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या इतर लोकांसह धडक देणाऱ्याने त्याला नायर रुग्णालयात दाखल केले. तिथे विनोदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विनोदच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
बीएमडब्ल्यूने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या विनोदाचा सात दिवस उपचारांची झुंज दिल्यानंतर शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बीएमडब्ल्यू चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कारचालक त्याच्या व्यावसायिक मालकाला वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कार्यक्रमासाठी घेऊन जात होता. त्याच दरम्यान हा सगळा प्रकार घडला.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपी ड्रायव्हर पळून गेला नव्हता. त्याने इतरांसह जखमी विनोदला त्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. आरोपी व्यक्तीवर यापूर्वी निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे गंभीर दुखापत केल्याबद्दल संबंधित कलमांखाली आरोप होते.
विनोद हा मूळचा मालवणचा असून तो ठाण्यामध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम करत होता. त्याच्या लहानपणीच आई-वडिलांचे निधन झालं होतं. त्यामुळे विनोदने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळविली होती. हिल रोड येथे त्याच्या चुलत बहिणीकडे विनोद राहात होता. डिसेंबरमध्ये विनोदचे लग्न देखील होणार होतं. त्यामुळेच त्याने मंगळसूत्र आणि अंगठीही खरेदी केली होती. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला.