मुलुंडमध्ये हिट ॲन्ड रन, ४ जखमी; मद्यधुंद तरुणाच्या ऑडीची दोन रिक्षांना धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 06:19 AM2024-07-23T06:19:54+5:302024-07-23T06:20:01+5:30
कांजूर येथे राहणारा विजय गोरे सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ऑडीने मुलुंडमधील डम्पिंग रोडवरून भरधाव वेगाने जात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वरळीतील बीएमडब्ल्यू ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरण ताजे असतानाच मुलुंडमध्ये मद्यधुंद अवस्थेत ऑडी चालविणाऱ्या चालकाने दोन रिक्षांना धडक दिल्याचा प्रकार सोमवारी घडला. या घटनेत चार जण जखमी झाले. ऑडीचालक विजय गोरे (४३) याला कांजूर येथून अटक करण्यात आली. या घटनेनंतर रिक्षाचालकांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत चालकावर कठोर कारवाईची मागणी केली.
कांजूर येथे राहणारा विजय गोरे सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ऑडीने मुलुंडमधील डम्पिंग रोडवरून भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेल्या ऑडीने समोरून येणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की अपघातग्रस्त रिक्षा अन्य रिक्षावर आपटली. दोन्ही रिक्षांचे चालक आणि दोन प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले. ऑडीचालक गोरेने घटनास्थळावरून पळ काढला.
मोबाइलही त्याने कारमध्येच सोडून दिला. गोरेविरोधात मुलुंड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम २८१, १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केला.
जखमीची नावे : या अपघातात प्रवासी प्रकाश जाधव (४६), हेमंत चव्हाण (५७) यांच्यासह रिक्षाचालक संतोष वालेकर आणि आकाश जयस्वाल जखमी झाले आहेत.
असा घेतला चालकाचा शोध...
nगाडीची नोंदणी आणि मोबाइल आधारे पोलिसांना आरटीओकडून गोरेची माहिती आणि मालाडच्या घरचा पत्ता मिळाला. ही गाडी मालाडच्या घरावर नोंद होती. मात्र, तेथून तो कांजूर परिसरात राहण्यास आल्याचे समजताच पथकाने कांजूरचे घर गाठले.
nकांजूरचे घरही बंद असल्याने गोरेला कांजूर पूर्वेकडील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. अपघातावेळी तो मद्याच्या अंमलाखाली होता. गोरे याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यातील एक नमुना पुढील चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला.