मुलुंडमध्ये ‘हिट अँड रन’; महिला ठार, चालक फरार, फरार ट्रकचालकाचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 05:33 AM2024-12-02T05:33:00+5:302024-12-02T05:33:15+5:30
या घटनेने पुनमिया कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे.
मुंबई : भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार झाल्याची घटना मुलुंड येथे घडली. ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलुंड पश्चिमेकडील एटीगेटेड कमल सोसायटीत राहणारे विशाल पुनमिया पत्नी अमृता आणि मुलीसह शनिवारी रात्री ११च्या सुमारास दुचाकीने तांबेनगर परिसराकडे चालले होते. त्याचवेळी मुलुंड गोरेगाव लिंक रोड परिसरात पाठीमागून येणाऱ्या ट्रकने विशाल यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. या अपघातात अमृता ट्रकच्या चाकाखाली आल्या. घटनास्थळावरून ट्रकचालकाने पलायन केले. अमृता यांना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात विशाल आणि त्यांची मुलगी जखमी झाले. या घटनेने पुनमिया कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. फरार ट्रकचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी चव्हाण यांनी दिली.