Join us

पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 12:29 PM

धडकेनंतर बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरील महिलेला काही अंतर फरफटत नेल्यानी ती गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

Worli Accident ( Marathi News ) : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता कायम असतानाच आता मुंबईतील वरळीतही आज सकाळी एक भीषण घटना घडली आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीस्वार जोडप्याला धडक दिली असून या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. धडकेनंतर बीएमडब्ल्यू कारने दुचाकीवरील महिलेला काही अंतर फरफटत नेल्यानी ती गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तर महिलेच्या पतीने वेळीच बाजूला उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे. अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा होता. अपघाताच्या घटनेनंतर मिहीर शहा फरार झाला असून पोलिसांनी चौकशीसाठी वडील राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील अॅट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला आहे. मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात नाकवा हे कोळी दाम्पत्य वास्तव्यास होतं. हे दाम्पत्य आज सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला गेले होते. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना नाकवा यांच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. त्यानंतर दोघेही कारच्या बोनेटवर पडले. पतीने वेळीच प्रसंगावधान दाखवत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. पण महिला मात्र कारसोबत फरफटत गेली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तिथे डॉक्टरांनी सदर महिलेला मृत घोषित केलं.

मुलगा फरार, वडील ताब्यात!

बीएमडब्ल्यू कारमध्ये असलेला मिहीर शहा आणि चालक हे दोघे फरार असून मिहीरचे वडील आणि शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच मिहीर याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी गोरेगावमधून ताब्यात घेतलं आहे. घटनेनंतर मिहीर गोरेगावला त्याच्या मैत्रिणीकडे गेल्याची माहिती असून त्याचा फोन सध्या बंद आहे. पोलिसांनी अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करत फरार असलेल्या मिहीर शहाचा शोध सुरू केला आहे.   

टॅग्स :वरळीअपघातमुंबईएकनाथ शिंदेशिवसेना