मुसळधार पावसाचा फटका; उद्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 09:10 PM2024-07-25T21:10:15+5:302024-07-25T21:10:59+5:30
Rain Updates: भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांना उद्या (२६ जुलै २०२४) रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ठाणे, पुणे, पालघर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत रात्रभर झालेल्या पावसामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा, विमान सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांची गैरसोय झाली असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या रायगड जिल्ह्यातील अनेक नद्या ओसांडून वाहत आहेत, प्रशासन प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून उद्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यासह ठाणे, बदलापूर, सातारा, कोल्हापूरसह अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. राज्यात उद्या देखील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.