मुंबई - आपल्याविरोधात सोशल मिडीयामध्ये ट्रोल करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मी व्यंगचित्र काढून सोशल मिडीयावर टाकून देतो, मुद्द्याला मुद्द्यांनी उत्तर मिळणार असेल तर चालेल, हलकासा विनोदही चालेल मात्र आपल्या कोणत्याही भूमिकेवर शिव्या घातल्या गेल्या तर अशांना घराबाहेर काढून मारा असा आदेश देत भाजपची नाटकं खूप झाली, सरकारने याबाबत खबरदारी घ्यावी असा इशारा राज यांनी राज्य सरकारला दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर ट्रोल करणारे संदेश फिरत होते याचा समाचार घेताना राज यांनी हे वक्तव्य केलं. भाजपच्या काही मंडळींकडून अशा पद्धतीने ट्रोलिंग केलं जातंय. मात्र भाजपच्या भंपक पोरांनी केलेल्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही असंही राज यांनी सांगितले.
मागच्या काही दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि पुणे याठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरलेल्या माणसांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या होत्या. मनसेविरोधात पातळी सोडून बोलणार असाल तर त्याला चोपलंच जाईल, कारण याविरोधात तक्रारी देऊन काही फरक पडत नाही त्यामुळे अशा ट्रोलिंग करणाऱ्या लोकांना मारलं जाईल अशी प्रतिक्रीया मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
याआधी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा असं वक्तव्य केले होते.