Join us

धारावीतले व्यवसाय होणार आता हायटेक

By admin | Published: January 08, 2017 2:08 AM

स्मार्टफोन्सचा वापर वाढला आहे. मग, या स्मार्टफोन्सचा वापर करून व्यापाऱ्यांकडच्या वस्तू, उत्पादने पाहता आणि खरेदी करता आल्या तर... या विचाराने प्रेरित होऊन मुंबई आयआयटीच्या

मुंबई : स्मार्टफोन्सचा वापर वाढला आहे. मग, या स्मार्टफोन्सचा वापर करून व्यापाऱ्यांकडच्या वस्तू, उत्पादने पाहता आणि खरेदी करता आल्या तर... या विचाराने प्रेरित होऊन मुंबई आयआयटीच्या ‘इंडस्ट्रीयल डिझाइन सेंटर’च्या विद्यार्थ्यांनी एक यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र धारावीतील व्यापाऱ्यांसाठी विकसित केले आहे. या यंत्रामुळे व्यापाऱ्यांकडील उत्पादने स्मार्टफोनवर दिसू शकतील. आयआयटीयन्सच्या प्रकल्पाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. धारावीच्या ३० दुकानांमध्ये हे यंत्र बसविण्यात आले आहे. यामुळे या दुकानांमधील उत्पादने, वस्तू ग्राहकाला स्मार्टफोनवर सहज पाहता येणार आहेत. यासाठी मोबाइलचे ब्ल्यू टूथ, लोकेशन आणि इंटरनेट सुरू असणे आवश्यक आहे. ब्ल्यू टूथ सुरू असल्यास ग्राहकाला नोटिफिकेशन येते. त्यानंतर ग्राहक तिथे उपलब्ध असलेली सर्व उत्पादने पाहू शकतो. इंटरफेसच्या माध्यमातून ग्राहक दुकानदाराशी, व्यापाराशी संपर्क साधू शकतो. समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या घटकांसाठी तंत्रज्ञान सहज उपलब्ध होते. समाजातील हाच घटक त्याचा वापर करू शकतो. पण, ज्या व्यक्तींना खरंच तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. पण, आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, अशांसाठी तंत्रज्ञान विकसित होणे आवश्यक वाटले. त्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा होईल आणि त्यांची प्रगती होऊ शकते या विचाराने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. धारावीतील व्यवसायांना आॅनलाइन व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे केल्याची माहिती चिन्मय परब याने दिली. (प्रतिनिधी)