VIDEO: हितेंद्र ठाकूरांची तीन मतं काँग्रेसला? विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेत्यांनी केलं 'वेलकम'!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:06 PM2022-06-20T15:06:40+5:302022-06-20T15:08:19+5:30
राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगण्यात असल्यामुळे दहाव्या जागेसाठीची लढत चुरशीची होणार आहे.
मुंबई-
राज्याच्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरू आहे. दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगण्यात असल्यामुळे दहाव्या जागेसाठीची लढत चुरशीची होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मत आता महत्वाचं झालं आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांना मोठं महत्व प्राप्त झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी वसई-विरार भागात प्राबल्य असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मतं महत्वाची ठरली होती. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ही तीन मतं मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि भाजपा नेत्यांकडूनही फोनाफोनी सुरू होती. पण बहुजन विकास आघाडीची मतं काँग्रेसला जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यामागचं कारणही तसंच आहे.
विधान परिषद निवडणुकीचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
विधान परिषदेच्या निवडणूकीला मतदान करण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे इतर दोन आमदार दुपारी अडीचच्या सुमारास विधान भवनात पोहोचले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी जो आमची कामं करेल त्यालाच आम्ही मतदान करू असं म्हटलं. त्यानंतर विधान भवनात प्रवेश करताच त्यांच्या स्वागतासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम, अमर राजूरकर आणि झिशान सिद्दीकी पोहोचले होते. काँग्रेसच्या आमदारांनी हितेंद्र ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या आमदारांचं स्वागत केलं. यावेळी हितेंद्र ठाकूर आणि काँग्रेस नेत्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप देखील हितेंद्र ठाकूर यांच्या स्वागतासाठी जातीनं उपस्थित होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यात काँग्रेसला यश आलं की काय अशी चर्चा रंगली आहे.
VIDEO: हितेंद्र ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार मतदानासाठी विधान भवनात पोहोचले, काँग्रेस नेत्यांनी केलं 'वेलकम' pic.twitter.com/eKGVc9nGje
— Lokmat (@lokmat) June 20, 2022
राज्यसभेवेळी भाजपाला मतदान केल्याची चर्चा
राज्यसभा निवडणुकीवेळी मतदान करताना पक्षाच्या प्रतोदाला आपण देत असलेलं मत जाहीर करण्याचं बंधन असतं. पण अपक्ष आमदारांना त्यांचं मत गुलदस्त्यात ठेवण्याची मुभा असते. पण राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारानं बाजी मारल्यामुळे बहुजन विकास आघाडीची तीन मतं भाजपला गेल्याची चर्चा होती. राज्यसभेवेळी भाजपाला मतदान केल्यानंतर विधान परिषदेसाठी हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाखातर महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं निश्चित केल्याचं बोललं जात आहे.