हितेंद्र ठाकूर यांचा वसंत डावखरेंना पाठिंबा
By admin | Published: May 26, 2016 02:23 AM2016-05-26T02:23:11+5:302016-05-26T02:23:11+5:30
विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना बहुजन विकास आघाडीने आज पाठींबा जाहीर केला. विरार येथे नगरसेवकांच्या बैठकीत डावखरे यांच्या उपस्थितीत
विरार : विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना बहुजन विकास आघाडीने आज पाठींबा जाहीर केला. विरार येथे नगरसेवकांच्या बैठकीत डावखरे यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे १२८ मते आहेत. ती पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस लागली होती. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हितेंद्र ठाकूर यांना आपल्या घरी बोलावून वसंत डावखरे यांना मदत करण्यास सांगितले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी पाठिंब्यासाठी ठाकूर यांची त्यांच्या विरार येथील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत. मिलिंद नार्वेकर देखिल होते. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
आज अचानक वसंत डावखरे यांनी ठाकूर यांची विरार येथील विवा कॉलेजमध्ये भेट घेतली. यावेळी बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हजर होते.
तसेच आमदार क्षितीज ठाकूर,
आमदार विलास तरे, महापौर प्रवीणा ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, माजी खासदार बळीराम जाधव हेही उपस्थित होते.
एकही मत फुटू न देण्यासाठी चढाओढ
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडे १२८ मते आहेत. ती आपल्या पारड्यात पाडून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश आले आहे.
शिवसेना अजूनही भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्याकडील मते आपल्याकडे वळूवून घेण्यासाठी धडपडत आहे.
डावखरे आणि कथोरे
यांच्यातील वितुष्ट हे शिवसेनेच्या मंडळींना माहीत आहे, त्यामुळे ते त्यांच्या बाजूने झुकणार नाहीत, याचाही अंदाज शिवसेनेला आहे.
मनोज शिंदे यांना नोटीस
शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक हे काँग्रेस नगरसेवकांना फोन करून आमिष दाखिवत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी केला होता.
आता हा आरोप त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता असून या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. फाटक यांच्याविरोधात केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याने ते अडचणीत आले आहेत.
प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असतानाच सहा दिवसांपूर्वी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार फाटक यांच्यावर आरोप केले. ‘फाटक हे काही काळ काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे पक्षात निर्माण झालेल्या संबंधाचा ते गैरफायदा घेत आहेत. त्यांचा इतिहास तपासल्यास ते एका पक्षात निष्ठावंत राहू शकलेले नाहीत. आता त्यांच्याकडून काँग्रेसच्या नगरसेवकांना मतांसाठी पैशांचे आमिष दाखवले जात आहे,’ असा आरोप शिंदे यांनी केला होता. तसेच फाटक यांनी हे धंदे बंद केले नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकही काढले होते.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्र ार केली आहे. आरोपांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा दावा त्यांनी केला आहे.