मुंबई : वैद्यकीय शाखांमधील होमीओपॅथी एक महत्त्वाची शाखा आहे. होमीओपॅथीतील क्रोटोलस होरिस औषध एचआयव्हीची वाढ रोखू शकत असल्याचे संशोधन हैदराबादमध्ये झाले आहे. या संशोधनाच्या आधारावरच आता पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संशोधन करणार असल्याची माहिती डॉ. प्रवीण कुमार यांनी दिली. मुंबईत ११ व १२ एप्रिल रोजी पहिल्या जागतिक होमीओपॅथी परिषदेचे आयोजन मरिन लाइन्सच्या बिर्ला मातोश्रीत करण्यात आले आहे. या परिषदेत देशासह परदेशातील होमीओपॅथी डॉक्टर, संशोधक सहभागी झाले आहेत. या परिषदेत संशोधकांनी होमीओपॅथीचा वापर करून स्वाइन फ्लू, एमडीआर टीबी, एड्स हे आजार कशाप्रकारे रोखता येऊ शकतात, याविषयीचे सादरीकरण केले आहे. होमीओपॅथीत सापाच्या विषापासून क्रोटोलस होरिस नावाचे औषध तयार करण्यात आलेले आहे. या औषधाविषयी होमीओपॅथीच्या साहित्यात लिहिलेले आहे. हे औषध खूप प्रमाणात कावीळ झालेल्या रुग्णांसाठी वापरले जाते. हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीतील दोन संशोधकांनी या औषधाचा अभ्यास केला. यात त्यांना असे आढळून आले की, एचआयव्हीचे विषाणू शरीरात गेल्यावर आरएनएसारखे न राहता डीएनएसदृश दिसू लागतात. हे रक्तात मिसळल्यावर डीएनएसदृश दिसत असल्याने त्यांची वाढ होऊ लागते. यामुळे त्या व्यक्तीस एचआयव्हीची लागण होते. आरएनएचे होणारे ्नरूपांतरण हे औषध रोखते, असे संशोधकांना आढळून आल्याचे डॉ. कुमार यांनी सांगितले. हैदराबादने हे संशोधन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला सादर केले होते. संस्थेशी याविषयी अनेकदा चर्चा झाली. यानंतर त्यांनी या औषधाचे संशोधन करणार असल्याचे सांगितले. संशोधन पूर्ण झाल्यास एका वर्षात एचआयव्ही एड्स रोखण्यासाठी औषध मिळू शकते, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.
एचआयव्ही एडस रोखता येऊ शकतो
By admin | Published: April 12, 2015 2:05 AM