जुळल्या एचआयव्ही बाधित जोडप्यांच्या रेशीमगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:37 AM2018-11-26T01:37:45+5:302018-11-26T01:37:56+5:30
दहा जोडप्यांची फुटली ‘सुपारी’ : चुनाभट्टीत रंगला बाधितांचा वधू-वर मेळावा
- शेखर साळवे
मुंबई : कळत नकळत एचआयव्हीचा संसर्ग झाला म्हणून समाजाने नाकारलेल्या महिला व पुरुषांना आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. चिराग प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी चुनाभट्टीतील पूर्वेकडील पाटील गल्ली येथील बुद्धविहारमध्ये भरविण्यात आलेल्या विवाह मेळाव्यात दहा एचआयव्ही बाधित जोडप्यांचे विवाह जुळले.
एचआयव्ही बाधित हीच आपली जात समजून जात-धर्माच्या भेदाला छेद देत एकत्र आलेल्या या विवाहेच्छुकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे संस्थेच्या वतीने आयोजित वधू-वर मेळाव्यात या दहा जोडप्यांच्या विवाहाची सुपारी फुटली गेली. एक एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीच दुसऱ्या एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला शारीरिक, मानसिक व भावनिक आधार देऊ शकते. समाजातील एचआयव्हीग्रस्तांसाठी अनुरूप साथीदार मिळणे जवळपास अशक्य असते. त्यामुळे अशा व्यक्तींना जोडीदार मिळवून देण्यासाठी गेली सोळा वर्षे चिराग प्रतिष्ठान ही संस्था प्रयत्नशील आहे.
या मेळाव्यात सहभागी झालेल्या वधू-वरांना एकमेकांची माहिती देण्यात आली. संसर्ग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोनाची माहिती देऊन परस्परांचे संपर्क क्रमांक देऊन परस्परांची माहिती घेण्याची संधीही देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष लग्न जुळवण्याचा निर्णय त्यांच्यावरच सोपवण्यात आला होता. कारण त्यात अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्नही असतात. त्याशिवाय लग्न जमवताना कुटुंबाचाही सहभाग असतो, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.
तब्बल १५० बांधितांनी घेतला सहभाग
एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांच्या वधू-वर मेळाव्यात तब्बल १५० बाधितांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ८० पुरुष आणि ७० महिला सहभागी झाल्या होत्या.
या बधितांमध्ये तरुण मुलामुलींसह महिला व पुरुष सहभागी झाले होते. या ठिकाणी गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक अशा विविध राज्यांसह सोलापूर, पंढरपूर, भुसावळ, पुणे, औरंगाबाद या विविध जिल्ह्यांमधून एचआयव्ही बाधित सहभागी झाले होते.
तब्बल दहा जणांचे विवाह जमल्याने एकाकी जीवन जगणाºया एचआयव्हीग्रस्तांना नवीन जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन सापडला आहे. या जोडप्यांचा विवाह लावून देण्याची जबाबदारी संस्थेने घेतल्याचे कृष्णकांत प्रसाद यांनी सांगितले.