मुंबई - अखेर एक वर्ष चार महिन्यांपासून बंद असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील वैद्यकीय महाविद्यालयांत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) डिसेंबर महिन्यास सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रणाली बंद असल्याने या काळात डॉक्टर हाताने प्रिस्क्रिप्शन लिहीत होते.
एचएमआयएस बंद असल्याने रुग्णांसोबत डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे हाल झाले होते. वर्षभरापासून ही प्रणाली बंद असल्याने या रुग्णालयांतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाचा केस पेपर, तसेच रुग्णांची उपचारादरम्यान घेतलेली वैद्यकीय माहिती, डिस्चार्ज कार्ड आदी हाताने लिहावे लागे. त्यामुळे ही प्रणाली लवकर सुरू व्हावी, अशी आग्रही मागणी होत होती. वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी देशातील विविध रुग्णालयात जाऊन तेथील एचएमआयएसची पाहणी करत होते. त्यानंतर शासनाने नॅशनल इन्फरोमॅटिक्स सेंटर या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्राने विकसित केलेली ‘ नेक्स्ट जेन ई-हॉस्पिटल ‘ या अद्ययावत प्रणालीची निवड केली. वैद्यकीय विभागाने २६९ कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता दिली.
कामे कोणती? ओपीडी आणि अतितत्काळ विभागातील केस पेपर नोंदणी, रुग्णांचे उपचार, पॅथॉलॉजी विभागाचे रक्ताचे अहवाल, एक्स रे आणि सोनग्राफीचे अहवाल, उपचारादरम्यान रुग्णालयात दाखल असताना केलेले उपचार, तसेच डिस्चार्ज कार्डमध्ये भरावी लागणारी रुग्णाची सर्व माहिती हाताने भरावी लागत आहे.
एचएमआयएस सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर महिन्यात ही प्रणाली चालू करणार आहोत. विशेष म्हणजे राज्यभरातील विभागाच्या सर्व मेडिकल कॉलेज मध्ये ही प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. ही काम बघणारी संस्थासुद्धा निवडण्यात आली आहे, त्यामुळे आता लवकरच याचे काम सुरु होऊन ही प्रणाली कॉलेजेसमध्ये कार्याविन्त होणार आहे. - दिनेश वाघमारे, प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभाग