मुंबई :
गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांतील आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस) बंद असल्याने या रुग्णालयांतील डॉक्टरांना रुग्णाचा केस पेपर, तसेच रुग्णांची उपचारादरम्यान घेतलेली वैद्यकीय माहिती, डिस्चार्ज कार्ड आदी हाताने लिहून काढावे लागत होते. त्यामुळे डॉक्टर कमालीचे वैतागले होते. मात्र, आता त्यांचा हा त्रास बंद होणार आहे. एचएमआयएस प्रणाली येत्या आठ दिवसांत सुरू होणार आहे. यासंदर्भातील उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच झाली.
डिजिटल सेवा पुरविणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षी ५ जुलैला एचएमआयएस बंद केले होते. एकंदरच सेवा आणि त्यावरील शुल्क यावरून सेवा देणारी कंपनी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रकरण कोर्टात आहे. त्याअगोदर गेली १२ वर्षे हे काम डिजिटल पद्धतीने करण्यात येत होते. आता मात्र या १६ वैद्यकीय महाविद्यालयांना सर्व काम हाताने लिहून करावे लागत आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाची २३ वैद्यकीय महाविद्यालये असून त्यासोबत संलग्नित रुग्णालये आहेत. या रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येत असतात. आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अस्तित्वात नसल्याने रुग्णाचे केस पेपर हाताने लिहून रुग्णांना द्यावे लागत आहेत.
ही ती १६ रुग्णालये... मुंबई : सर जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय, कामा आणि आल्बेस रुग्णालय, जी. टी. रुग्णालय महाराष्ट्र : पुणे, नागपूर, यवतमाळ, लातूर, मिरज-सांगली, औरंगाबाद, अकोला, सोलापूर, नांदेड, अंबाजोगाई, सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये.
ही असतात कामे ओपीडी आणि अतितत्काळ विभागातील केस पेपर नोंदणी, रुग्णांचे उपचार, पॅथॉलॉजी विभागाचे रक्ताचे अहवाल, एक्स-रे आणि सोनोग्राफीचा अहवाल, उपचारादरम्यान रुग्णालयात दाखल असताना केलेले उपचार, तसेच डिस्चार्ज कार्डमध्ये भरावी लागणारी रुग्णाची सर्व माहिती हाताने भरावी लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी देशातील विविध रुग्णालयात जाऊन तेथील एचएमआयएसची पाहणी करत आहेत.
वैद्यकीय आयोगाकडून बंधनकारक राष्ट्रीय वैद्यकीय आयोगातर्फे सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ १६ वैद्यकीय महाविद्यालयांपुरताच मर्यादित राहिला नसून सर्व २३ वैद्यकीय महाविद्यालयांत ही प्रणाली बसविणे बंधनकारक झाले आहे. देशात कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात चांगली आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे, हे पाहण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध भागात जाऊन माहिती संकलित केली आहे. याप्रकरणी, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यासंदर्भात विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून त्यांनी याचा आढावा घेतला आहे. त्यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. याप्रकरणी उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेऊन आठ दिवसांत तोडगा काढण्यात येणार आहे.