मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचं संरक्षण; नाना पटोलेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 03:02 PM2024-05-14T15:02:21+5:302024-05-14T15:03:20+5:30

मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचे आशीर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डिंग लावले जावू शकत नाहीत असं पटोलेंनी म्हटलं.

Hoarding Mafia in Mumbai Protected by Mahayuti Corrupt Coalition Government- Congress Nana Patole | मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचं संरक्षण; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचं संरक्षण; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई -  घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन, राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डिंग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. 

नाना पटोले म्हणाले की, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू तर जवळपास ८८ जण जखमी झाल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढवून दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने केला पाहिजे. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, कमशिनच्या हव्यासातून मुंबई शहर बकाल केले आहे. घाटकोपरमधील होर्डिंग हे एक उदाहरण आहे, अशी हजारो होर्डींग अनधिकृत रितीने शहरभर झळकत आहेत असा आरोप त्यांनी केला. 

तसेच मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचे आशीर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डिंग लावले जावू शकत नाहीत. घाटकोपरच्या होर्डिंगला कोणी परवानगी दिली होती, त्यामागे कोणत्या राजकीय नेत्याची शिफारस होती का, या सर्वांची सखोल चौकशी करून खऱ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कारवाईच्या नावाखाली कोणाला तरी बळीचा बकरा करुन महाभ्रष्ट युती सरकार आपली सुटका करुन घेऊ शकत नाही असंही पटोलेंनी म्हटलं. 

दरम्यान, अवैध होर्डिंग असो वा मोडकळीस आलेल्या इमारती, महानगरपालिका फक्त नोटीस पाठवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असते आणि दुर्घटना झाल्यानंतर थातूर मातूर कारवाई केली जाते. मागील दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचे दोन पालकमंत्री महापालिकेच्या कार्यालयात स्वतःची कार्यालये थाटून बसले आहेत. हे दोन्ही पालकमंत्री काय झोपा काढत होते का? का बीएमसीच्या कार्यालयातून फक्त वसुलीचे काम करत होते? आता दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी झटकून दुसऱ्यांवर आरोप करण्याची नौटंकी भाजपा नेते करत आहेत असा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला. 

Web Title: Hoarding Mafia in Mumbai Protected by Mahayuti Corrupt Coalition Government- Congress Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.