राज्यभरातील होर्डिंग्जचे दरवर्षी होणार ऑडिट, घाटकोपर दुर्घटनेनंतर १.९ लाख होर्डिंग हटविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:42 IST2025-03-08T12:40:52+5:302025-03-08T12:42:03+5:30
भाजपचे योगेश सागर यांनी प्रश्न उपस्थित केला.

राज्यभरातील होर्डिंग्जचे दरवर्षी होणार ऑडिट, घाटकोपर दुर्घटनेनंतर १.९ लाख होर्डिंग हटविले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :घाटकोपर (मुंबई) येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील १ लाख ९ हजार ३८७ अवैध होर्डिंग हटविण्यात आली. सर्व महापालिका व नगरपालिकांच्या क्षेत्रांत होर्डिंगचे ऑडिट हे दरवर्षी केले जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले.
भाजपचे योगेश सागर यांनी प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवार, अमित साटम, जितेंद्र आव्हाड, सुभाष देशमुख, चेतन तुपे, वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न केले. मुंबईत फुटपाथवर होर्डिंग कसे लागले आहेत हे सांगताना सरदेसाई यांनी फोटोच दाखविले.
सरकार नवे धोरण आणणार
इमारतीच्या बाहेरही जाहिराती लावल्या जात आहेत, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. त्याची चौकशी करून कारवाईदेखील केली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर सर्व महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांमध्ये होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. आता सरकार होर्डिंगबाबतचे नवे धोरण आणणार असल्याचे ते म्हणाले.
५९ प्रकरणात गुन्हे दाखल
राज्यात एकूण नऊ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात १ लाख ९ हजार ३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे, तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
घाटकोपरसारख्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी अधिकृत आणि अनधिकृत सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट सर्व महापालिका आणि नगरपालिकांकडून करण्यात येणार येईल. दाट लोकवस्त्यांमध्ये होर्डिंग लावू नयेत, या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर सामंत यांनी या प्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले.