उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेचे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 12:46 PM2019-11-10T12:46:46+5:302019-11-10T12:48:24+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज अशा आशयाचे बॅनर मातोश्रीच्या परिसरात लागले आहे.

Hoardings Outside Matoshree Calling CM Maharashtra Only Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेचे बॅनर

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज, मातोश्रीच्या परिसरात शिवसेनेचे बॅनर

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर

मुंबई  - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. तर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज अशा आशयाचे बॅनर मातोश्रीच्या परिसरात लागले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही शिवसैनिकांची इच्छा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे अशी शिवसैनिकांची इच्छा आहे असे बॅनर लागले आहेत.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरुन झाल्यानंतर शिवसैनिकांची थेट उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणे ही महाराष्ट्राची गरज आहे असा मथळा बॅनरवर लिहिण्यात आला आहे. शिवसेना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे असे शिवसैनिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 



विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र निकलांनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेतली. पण भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती देण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने अधिकच ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे 13 व्या विधानसभेची मुदत संपल्यानंतरही नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे. 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री मालाड येथील रिट्रीट हॉटेलला अचानक भेट देत आमदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमदारांसोबतच हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना आमदारांची आज द रिट्रिट हॉटेलवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आदित्य ठाकरे हे दुपारी साडेबारा वाजता ही बैठक घेणार असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. 

राज्यात सरकार स्थापनेवरून संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. राज्यपालांच्या पुढाकारानेच आता राज्याला नवे सरकार मिळू शकते. राज्यपालांनी भाजपाला संधी दिली आहे, त्यांनी याला लाभ घेतला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाने बहुमत सिद्ध करून दाखवावं, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे. 

विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान, राज्यपालांनी भाजपाला दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, ''एकंदरीत परिस्थिती पाहता आता राज्यपालांच्या पुढाकारानेच राज्याला सरकार मिळू शकते. त्यांनी भाजपाला संधी दिली आहे. आता भाजपाने या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खरंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने यापूर्वीच सरकारस्थापनेसाठी दावा केला पाहिजे होता.''


 

Web Title: Hoardings Outside Matoshree Calling CM Maharashtra Only Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.