Join us

हॉक्स कॉल्समुळे वाढली पोलिसांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 9:21 AM

Mumbai Police: २६/११ दरम्यान हजारो कॉल एकाच वेळी आल्यामुळे पोलिसांचा नियंत्रण कक्ष पार कोलमडला होता. मात्र, सध्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुसज्ज आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांमध्ये निनावी कॉल्सची, धमक्यांच्या कॉल्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

मुंबई - २६/११ दरम्यान हजारो कॉल एकाच वेळी आल्यामुळे पोलिसांचा नियंत्रण कक्ष पार कोलमडला होता. मात्र, सध्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुसज्ज आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांमध्ये निनावी कॉल्सची, धमक्यांच्या कॉल्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. अमक्या ठिकाणी बॉम्बस्फोट होणार आहे, वगैरे सांगणाऱ्या कॉल्समुळे मुंबईपोलिसांची दमछाक होत आहे.

२०२१ मध्ये १८ हॉक्स कॉल करण्यात आले. २०२२ मध्ये हाच आकडा १५ होता. या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा कॉल आले. बहुतांश हे कॉल्स दारूच्या नशेत किंवा मानसिक स्थिती ठीक नसलेल्यांकडून येतात. शिवाय, जवळच्या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी केले जात आहे. मात्र, इथून पुढे अशा प्रकारे कॉल करून खोटी माहिती देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवत थेट अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कायदा व सुव्यवस्थेचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी देत त्यानुसार कारवाई केल्याचे सांगितले.

विशेष कायदा हवा...याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे या प्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. 

अशी होते धावपळ...नियंत्रण कक्षात कॉल येताच बॉम्ब शोधक व श्वान पथकासह सर्व यंत्रणांना याची माहिती दिली जाऊन तपासणी केली जाते. कॉल खोटा असल्याची खात्री होत नाही तोपर्यंत शेकडो मनुष्यबळ कामाला लागते. त्यात तथ्य न आढळल्यास कॉलधारकाचा शोध  घेण्याचा ताण यंत्रणांवर वाढतो.

टॅग्स :मुंबईपोलिस