कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस जोपासताहेत छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:08 AM2021-05-05T04:08:02+5:302021-05-05T04:08:02+5:30
कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस जोपासताहेत छंद, कुठे संगीतातून सकारात्मक सूर तर कुठे कवितेतून मिळते ऊर्जा .. कामाचा ...
कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस जोपासताहेत छंद,
कुठे संगीतातून सकारात्मक सूर तर कुठे कवितेतून मिळते ऊर्जा ..
कामाचा ताण कमी करण्यासाठी पोलीस जोपासताहेत छंद
कुठे संगीतातून सकारात्मक सूर, तर कुठे कवितेतून मिळते ऊर्जा
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात पोलीस दलावर सर्वाधिक ताण आहे. अशात, या ताणाकडे दुर्लक्ष करत मिळालेल्या वेळेत पोलीस आपली कला जोपासताना दिसत आहेत. यात, कुठे संगीतातून सकारात्मक सूर मिळत आहेत. तर कुठे कवितेतून ऊर्जा मिळताना दिसत आहे. पोलीस दलातील अशाच खाकीतील ‘कलाकारां’चा घेतलेला हा आढावा.
कोरोना संदर्भात लागू करण्यात आलेल्या आदेशांची अंंमलबजावणी, नाकाबंदी, वाहन तपासणी, बंदोबस्त, त्यात कोविड रुग्णालय सुरक्षाव्यवस्था, चाचणीसाठी आलेल्या किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची नोंदणी, रुग्णाचा मृत्यू झाल्यास पंचनाम्यापासून अंत्यविधीपर्यंतची जबाबदारी, विलगीकरण केंद्रांबाहेरील बंदोबस्त, होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्या व्यक्तीची माहिती घेणे, तसेच विविध बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर आहे. त्यात गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.
या दरम्यान पोलिसांचा थेट जनतेशी संपर्क होत आहे. अशात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा फटका पोलीस दलालाही बसत आहे. आतापर्यंत मुंबईत १०५हून अधिक पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र न घाबरता ते त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. अशात त्यांच्यातील अनेक जण स्वतःच्या कलेतून आपल्यावरील ताण कमी करत स्वतःला फिट ठेवताना दिसत आहेत.
* संगीतातून मिळतो सकारात्मक सूर
नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेले सतीश सोनावणे सध्या वरळी वाहतूक मुख्यालयात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. मुलुंड परिसरात पत्नी आणि दोन मुलांसोबत ते राहतात. लहानपणापासून गाण्याची आवड होती. अशात, नागपूर फाउंडेशनने पोलिसांसाठी गायनाच्या स्पर्धेचे आयोजन केले. त्यात सहभाग घेतल्यानंतर उत्साह वाढला. विरंगुळा म्हणून स्टेज शोही सुरू केल्याचे सोनावणे सांगतात. अशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुरुवातीला कोरोनाबाबत जास्त जनजागृती नव्हती. अशात, थोडी भीतीही वाटली. मात्र आजूबाजूचे बरे होताना पाहून सकारात्मक विचाराने त्याकडे बघितले. या काळात गायनाची आवडही खूप रामबाण ठरल्याचेही ते आवर्जून नमूद करतात.
आजही १२ तास सेवा बजावल्यानंतर घरी आल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळेत गायनाचा सराव करतो. वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो. काही मिनिटांसाठी तरी त्या गायनातून कोरोनाच्या वातावरणात स्वतःबरोबर नागरिकांवरचा ताण कमी व्हावा, हीच धडपड असते असे ते सांगतात. सध्या गेल्या महिनाभर आजारपणामुळे ते घरीच आहेत. अशातही ही आवड बळ देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
* फिटनेस जरुरी आहे
सकाळी ५ वाजता उठायचे. योग झाल्यानंतर स्वयंपाकघरातली कामे उरकण्याची घाई. अशात सातच्या ठोक्याला घर सोडून ८ पर्यंत मुलुंडहून गोरेगाव येथील ड्युटीचे स्थान गाठायचे. १२ तास सेवा केल्यानंतर, पुन्हा घरी आल्यानंतर स्वतःची काळजी घेत आधी अंघोळ, कपडे धुऊन पुन्हा स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची गडबड... मरोळ येथील सशस्त्र पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या स्वाती डोईफोडे यांचा हा दिनक्रम ठरलेला. अशात, धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये त्यांचा फिटनेसवर भर असतो. योग्य आहार, नियमित योग आणि प्रामाणिकपणे सेवा ही त्यांची त्रिसूत्री ठरलेलीच. यातच सुट्टीच्या दिवशी त्या आपली कला जोपासताना दिसतात. त्यांना अभिनयाची, चित्रकलेची आवड आहे. अशात वेगवेगळ्या गाणी, डायलॉगवर अभिनय करत ते व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओची चर्चा आहे. घरात पती आणि ४ वर्षांचा मुलगा आहे.
डोईफोडे सांगतात, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कला लपलेल्या आहेत. सध्या कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे. अशात मिळालेल्या वेळेत आपली कला जोपासणे गरजेचे आहे. आम्हाला घरी राहणे शक्य नाही. आम्ही तुमच्यासाठी घराबाहेर आहोत. तुम्ही घरी राहून स्वतःची काळजी घ्या. स्वतःमध्ये दडलेल्या कलांना बाहेर काढा. हे संकट लवकर संपणार आहे. तुम्हीही त्याचा ताण न घेता काळजी घ्या, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
* कवितातून मिळते ऊर्जा
लहानपणापासून कवितेची आवड असलेले गुन्हे शाखेच्या कक्ष २ मध्ये कार्यरत असलेले सहायक उपनिरीक्षक अविनाश वळवी मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील. १९९० मध्ये पोलीस दलात रुजू झाले. शक्ती मिल सामूहिक बलात्कार तसेच अनेक महत्त्वाच्या गन्ह्यांत त्यांची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. अशात नेहमी येणारे अनुभव, आजूबाजूच्या घडामोडींना ते कवितेत मांडू लागले. ९० साली तत्कालीन एसीपी प्रदीप काळे यांनी छान कविता लिहितो म्हटले आणि उत्साह वाढल्याचे ते सांगतात.
वळवी हे उल्हासनगर येथे पत्नी, मुलगी आणि मुलासोबत राहण्यास आहेत. मुलगीही डॉक्टर असून सध्या बदलापूरच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत आहे. मी आदिवासी आहे. अशात तपासाकामी खेडोपाड्यात जाणे होते. अशात, त्यांनी आदिवासी कलाकारासाठी उभे राहण्याचे ठरवले. आणि त्यांच्या संघटना तयार केल्या. त्यांना मार्गदर्शन करत नंदुरबार जिल्ह्यातील ४२ संघटनांची नोंदणी केली. यातच अडीचशेहून अधिक पुरस्कार, प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहेत. आतापर्यंत ९ ग्रंथ प्रकाशित झाले. कोरोनाच्या काळातही त्यांनी विविध कविता केल्या आहेत.
उल्हासनगरहून कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी दीड तास आणि घरी पोहोचण्यासाठी दीड तास मिळतो. तसेच घरी आल्यानंतर मिळालेल्या वेळेत ते कविता लिहून काढत होते. कोरोनाच्या काळात या कवितांमधून ऊर्जा मिळत असल्याचे ते सांगतात. अशात नागरिकांनीही घरी राहून स्वतःची काळजी घेत आपले छंद जोपासा असे आवाहन त्यांनी केले.
..................................