Join us

स्पाेर्ट्सच्या दुकानांतून हॉकी स्टिक झाली गायब! क्रिकेटनंतर आता बॅडमिंटन, लॉन टेनिसला प्राधान्य

By मनोज गडनीस | Published: November 08, 2022 6:14 AM

भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला जास्त पसंती नाही, त्यामुळे आता स्पोर्ट्सच्या दुकानातूनही हॉकी स्टिक मिळणे दुर्मीळ झाले आहे.

मुंबई :

भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला जास्त पसंती नाही, त्यामुळे आता स्पोर्ट्सच्या दुकानातूनही हॉकी स्टिक मिळणे दुर्मीळ झाले आहे. त्याऐवजी स्पोर्ट्सच्या दुकानातील साहित्यात क्रिकेट हे विक्रीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे त्यापाठोपाठ बॅडमिंटन व लॉन टेनिसच्या रॅकेटची विक्री जोमाने होताना दिसत आहे. 

या संदर्भात बोलताना स्पोर्ट्स दुकानाचे मालक अमित तिवारी म्हणाले, मुंबईत तुम्हाला हॉकी स्टिक मिळणे दुर्मीळच झाले आहे. तुम्हाला हॉकी स्टिक हवीच असेल तर आमच्यासारख्या दुकानांत ती तातडीने उपलब्ध होत नाही. मात्र, एखाद्याला  हवीच असेल तर ऑर्डर घेऊन एका आठवड्यात आम्ही ती उपलब्ध करून देतो. परंतु जर तुम्हाला त्याच दिवशी हॉकी स्टिक हवी असेल तर मात्र, मुंबईत किमान १० दुकाने फिरावी लागतील.

क्रीडा साहित्याची विक्री करणाऱ्या दिनशॉ म्हणाले की,  हा खेळ हळूहळू कमी होत आहे. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे. तो असा लोप पावत असल्याची खंत वाटते. हॉकीऐवजी बॅडमिंटन आणि लॉन टेनिस या खेळांकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे. एकेकाळी आमच्याकडे २६५ रुपयांपासून तब्बल २२ हजार रुपये किमतीच्या हॉकी स्टिक दुकानात असत. आता मात्र त्यांची जागा बॅडमिंटन, लॉन टेनिसने घेतली आहे. तसेच फुटबॉलचीही क्रेझ लोकांमध्ये आहे. त्यामुळे त्याचीही विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. विविध क्रीडा साहित्य ऑनलाइन मागविण्याकडे लोकांचा कल वाढत असला तरी क्रीडा साहित्याची विक्री करणारी मुंबईमध्ये ५०० पेक्षा जास्त दुकाने तग धरून आहेत. त्यातच काही मोठ्या ब्रँडनी महाकाय दुकाने सुरू केल्यामुळे आजवर क्रीडा साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांची परिस्थिती बिकट झाली आहे. अव्वल क्रमांक क्रिकेटचाच क्रिकेट हा मुंबईकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा खेळ आहे. मुंबईच्या अनेक मैदानांवर क्रिकेट प्रशिक्षणाचे वर्ग चालतात. यासाठी तुमचा स्वतःचा क्रिकेटचा किट असणे आवश्यक आहे. क्रीडा साहित्यांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये आजच्या घडीला किमान सहा हजार ते कमाल दीड लाख रुपये किमतीचे क्रिकेट किट उपलब्ध आहेत.

टॅग्स :हॉकी