मुंबई : ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ हे तुझे की माझे? माझे की तुझे? यावरून वाद सुरू झाला. तेव्हा वेदना होत होत्या. कशा प्रकारचे राजकारण आज महाराष्ट्र बघतोय? लहानपणापासून मी शिवसेना पाहिली नाही, तर जगलो आहे. त्यामुळे आत्ताची स्थिती पाहवत नाही. आज शेतकरी, महिला, विद्यार्थी सरकारकडे बघतायत आणि सरकार कोर्टाकडे बघतेय. आमचे काय होणार? आमचा निर्णय कधी लागतोय? असं कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. आताची राजकीय परिस्थिती पाहता सगळ्यांनी एकदा ठरवा आणि आताच विधानसभा निवडणुका लावा. जो काय सोक्षमोक्ष व्हायचा तो एकदा होऊनच जाऊन दे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांना इशारा दिला.
एकनाथ शिंदेंना मला एकच सांगायचं आहे की, महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे जिथे सभा घेतात तिथे उत्तर द्यायला सभा घेऊ नका. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा विषय अडकला आहे तो विषय मिटवा. अवकाळीने शेतकरी ग्रासलाय, तरुणांच्या हाती रोजगार नाही, राज्यात उद्योग येत नाहीत, असे अनेक विषय आहेत ते सगळे प्रश्न हाती घ्या. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना भेटा.. सभा घेत फिरू नका, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला. धनुष्य बाण यांना कधीच पेलवले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला.
अडीच वर्षांपूर्वी जी थेरं केली त्यामुळेच अलीबाबा आणि चाळीस जण गेले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचेही समर्थन केले. कोविडच्या काळात उद्धव कुणालाच भेटायला तयार नव्हते. एक आमदार मुलाला घेऊन उद्धव यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी मुलाला बाहेर ठेवलं. आमदाराला भेट दिली. हे असे वागल्यानंतर २१ जूनला कळालं की एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले.
हे सुजाण मुस्लिमांना पटते का?मला धर्माभिमानी हिंदू हवाय. दुसऱ्या धर्माचा आदर करणारा हिंदू हवाय. मला राष्ट्राभिमानी मुसलमान हवा असल्याचे सांगताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाबरोबरच मुस्लिम समाज दुखाणार नाही याचीही काळजी घेतली. माहीमच्या समुद्रात चाललेले अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम हे तुम्हा सुजाण मुस्लिमांना पटते का, असाही सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर प्रतागपड येथील अफझलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडल्याबद्दल सरकारचे अभिनंदनही केले. सुशोभीकरणाच्या नावाखाली १७०० काेटी खर्च केले जात असल्याबद्दल शिंदे सरकारवर नाराजी व्यक्त केली.