Join us

यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 12:42 PM

मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी असे दोन दिवस आयोजित केलेले होते.

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये घेण्यात येत होती. यावरून देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात टीकाही झाली होती. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आले. यावरून भाजपाचे आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे विद्यापीठ कायद्यावरील प्रशिक्षण 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी असे दोन दिवस आयोजित केलेले होते. नेहमीप्रमाणे हे प्रशिक्षण शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी प्रशिक्षण पार पडले. मात्र, दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आले. या प्रशिक्षणावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. यामुळे हे खेदजनक असून पुरोगामी महाराष्ट्रात वैचारिक अस्पृश्यता दाखविणारे असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. 

अधिकाऱ्यांचे हे प्रशिक्षण हे कायद्याविषयीचे होते. काँग्रेसने आक्षेप घेत ते तडकाफडकी रद्द करण्यास लावले या कृत्याचे तुम्ही समर्थन करणार नाही, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांच्याकडून शेलार यांनी व्यक्त केली. तसेच यापुढची प्रशिक्षणे मदरसे किंवा बार, रेस्टॉरंटमध्ये घ्यावीत, असा टोलाही लगावला आहे. तसेच वैचारिक अस्पृश्यता असेल तर याआधी संघ विचाराचे सरकार होते. त्यामुळे विधानसभेतील बाकेही धुवून पुसून घ्यावीत, असा खोचक टोला लगावला आहे. 

काँग्रेसच्या माजी खासदारांनी वैचारिक अस्पृश्यता दाखविली त्यांना वैचारिक दिवाळखोरीचा पुरस्कार द्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याने योग्य दखल घ्याल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. 

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेभाजपाकाँग्रेसराष्ट्रीय स्वयंसेवक संघमहाराष्ट्र विकास आघाडी