वर्सोवा: समुद्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाबाबत बैठक लावा; आमदार भारती लव्हेकरांचे आदित्य ठाकरेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 06:45 PM2021-08-17T18:45:08+5:302021-08-17T18:45:26+5:30
मुंबई- वर्सोवा सागर किनारी बांधण्यात येत असलेल्या समुद्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम जवळजवळ पूर्णत्वास आलेले आहे. तथापि, काही व्यक्तींच्या आक्षेपांमुळे ...
मुंबई- वर्सोवा सागर किनारी बांधण्यात येत असलेल्या समुद्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम जवळजवळ पूर्णत्वास आलेले आहे. तथापि, काही व्यक्तींच्या आक्षेपांमुळे आपण या कामास स्थगिती दिल्याचे समजते. सदर कामासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर बैठक लावावी. कामाच्या सर्व परवानग्या व ना हरकती तपासून घेण्यात याव्या आणि पालकमंत्री या नात्याने या कामासंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे. (Hold a meeting about the work of Versova embankment MLA Bharti Lovekar's Letter to Aditya Thackeray )
वर्सोवा मतदार संघातील वर्सोवा सागरी किनारी पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्यानंतर तसेच भरतीच्या वेळी पाणी सागर किनारी वसलेल्या झोपडपट्टी तसेच नागरी सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरते. वर्सोवा विधानसभा क्षेत्र समुद्र किनारी वसलेले असून किनारपट्टीच्या जमिनीची धूप ही गंभीर समस्या गेली कित्येक वर्षे रहिवाशांना सतावत आहे. समुद्राच्या लाटा दर वर्षी किनारपट्टीवर आदळत असून त्यामुळे लगतच्या रहिवासी सोसायट्यां मध्ये पाणी घुसून मोठी हानी होत असते. यासंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत असून धूप प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी सतत मागण्या होत होत्या. यासंदर्भात स्थानिक आमदार म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा करत होते, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या विषयाबाबत आवश्यक पर्यावरणासंदर्भातील सर्वेक्षण होऊन वर्सोवा किनारपट्टीलगत तात्काळ धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासंदर्भात शासनाकडून सूचित करण्यात आले. या प्रस्तावासाठी मोठा खर्च असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समुद्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ती मान्य केली व 15 मे 2015 रोजी वर्सोवा सागरी किनारी समुद्र धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी देत असल्याचे पत्र भारत सरकारकडून बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आले, असे आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.