मुंबई महापालिकेत शिवसेनेला धारेवर धरा - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 07:06 AM2020-01-22T07:06:46+5:302020-01-22T07:07:22+5:30
मुंबई महापालिकेत हा विरोध प्रकर्षाने दिसला पाहिजे. महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा
मुंबई : मुंबई महापालिकेत सुरुवातीला दोन वर्षे आपण शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिलेला होता, पण आज आपण राज्यात शिवसेनेच्या विरोधात आहोत, मुंबई महापालिकेत हा विरोध प्रकर्षाने दिसला पाहिजे. महापालिकेत शिवसेनेची जोरदार कोंडी करा, असे आदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील भाजपचे आमदार आणि नगरसेवकांना दिले.
मुंबई महापालिकेत भाजपचे मोठे संख्याबळ आहे. तसा दबदबादेखील दिसला पाहिजे. शिवसेनेने जिथे मनमानी निर्णय घेतले तिथे तुटून पडले पाहिजे. आमदारांनीदेखील नगरसेवकांना शिवसेनेला धारेवर धरण्याचे मुद्दे दिले पाहिजेत. आमदार, नगरसेवक या दोघांमध्येदेखील समन्वय दिसला पाहिजे. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी आतापासून करा, असे फडणवीस यांनी सांगितले. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा, आ. आशिष शेलार आदी उपस्थित होते.
मुंबई अध्यक्षपदी पुन्हा लोढा यांचीच निवड!
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांचीच पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. चालू महिन्याअखेर ही निवडणूक होईल. तत्कालीन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर लोढा यांची जुलै २०१९ मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुंबई भाजपने अधिक आक्रमक होण्याची गरज असताना तसे प्रत्यक्षात चित्र दिसत नाही, असा एक सूर असला तरी त्यामुळे लोढा यांच्या पदाला धोका नाही, तेच पुन्हा अध्यक्ष होतील, असे म्हटले जाते.