रात्रभर समुद्रात एकमेकांचे हात धरून मदतीसाठी आरडा-ओरडा करत होतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:05 AM2021-05-23T04:05:33+5:302021-05-23T04:05:33+5:30

पण कोणीच आले नाही... अभियंत्याचा थरकाप उडविणारा अनुभव रात्रभर समुद्रात एकमेकांचे हात धरून मदतीसाठी आरडाओरडा करत होतो कोणीच धावून ...

Holding each other's hands in the sea all night, they were shouting for help ... | रात्रभर समुद्रात एकमेकांचे हात धरून मदतीसाठी आरडा-ओरडा करत होतो...

रात्रभर समुद्रात एकमेकांचे हात धरून मदतीसाठी आरडा-ओरडा करत होतो...

Next

पण कोणीच आले नाही... अभियंत्याचा थरकाप उडविणारा अनुभव

रात्रभर समुद्रात एकमेकांचे हात धरून मदतीसाठी आरडाओरडा करत होतो

कोणीच धावून आले नाही; अभियंत्याचा थरकाप उडविणारा अनुभव

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ताशी ६० ते ७० नॉट्स वेगाने वाहणारा वारा... त्यात आठही नांगर तुटल्याने हेलकावणारी बार्ज ओनएजीसी प्लॅटफाॅर्म एचसीवर धडकली. बार्जमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होताच एकेकाने लाईफजॅकेट घालून पाण्यात उड्या घेण्यास सुरुवात केली. बार्ज बुडायला सुरुवात होताच संध्याकाळच्या सुमारास आम्हीही समुद्रात उड्या घेतल्या. १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आमच्या मदतीला कोणीही पोहोचू शकत नव्हते. डोळ्यासमोर मृत्यू उभा ठाकला हाेता. देवाचा धावा करत होताे. सुदैवाने मदत मिळाली आणि आम्ही बचावलो. काळजाचा थरकाप उडविणारा हा अनुभव या दुर्घटनेतून वाचलेले अभियंता मुस्ताफिजुर रेहमान शेख यांनी पोलिसांपुढे कथन केला.

मालाड परिसरात राहणारे मुस्ताफिजुर रेहमान हुसेन शेख (४९) डिसेंबर २००५ पासून ओडीसी शिपिंग या कंपनीचे ॲकोमेडेशन क्रेन बार्ज यावर जनरेटर, एसी यंत्रणा, विद्युत यंत्रणा, पंप यासंबधी कामकाजावर प्रमुख म्हणून काम करत होते. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून ते बार्ज पी - ३०५ वर आहेत. १२- १३ मे च्या दरम्यान तौक्ते चक्रीवादळ येण्याची पूर्वसूचना भारतीय हवामान विभागाकडून मिळाली. १५ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास जोरादार वारे वाहू लागले. वाऱ्याचा ताशी वेग ४०-५० नाॅट्स एवढा होता. त्या रात्री आम्ही एकूण २६१ लोक बार्जवर होतो. त्यामध्ये २४ क्रू, जेवण बनविणारे २५ लोक व इतर कंपनींचे लोक उपस्थित होते. रात्री १२ नंतर वाऱ्याचा वेग दुप्पट झाला. वादळाचा आवाज धडकी भरविणारा होता. अँकर तुटले.

त्यानंतर पहाटे ४ वाजताच्या सुमारास एस १, एस २, पी १ असे तीन अँकर तुटले व बार्ज जोराने हेलकावे खाऊ लागले. बार्जवरील आम्ही २६१ लोक रात्रभर जागे होतो. सकाळी ८ वाजता सर्व अँकर तुटलेले होते. बार्जला आधार नव्हता. वाऱ्याचा वेग (६० ते ७० नाॅट) असल्याने जहाजावरील १७ टनांचा कंटेनर जहाजावरून समुद्रात पडला. पावणे दहाच्या सुमारास बार्ज ओनएजीसी प्लटफाॅर्म एचसी धडकले. कम्पार्टमेंटमध्ये समुद्राचे पाणी येण्यास सुरूवात झाली. बार्ज बुडण्यास सुरुवात झाली. सकाळी साडेदहाच्या सुमारास २० ते २५ जणांनी पाण्यात लाईफ राफ्ट टाकून बार्ज सोडला. त्यावेळी जवळ असलेल्या नीलम फिल्डवरील तराफ्याला मदतीस येण्याची विनंती केली. इंडियन नेव्हीलाही कळविले. दरम्यान, इंडियन नेव्ही व इतर बोटी बचावासाठी आल्या, परंतु वाऱ्याचा वेग ७० ते ८० नाॅट असल्याने इतर बोटी बचावासाठी पुढे येऊ शकत नव्हत्या.

* ...अन् जीव वाचला

सायंकाळी ५ वाजता सर्वांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. त्यापूर्वी मीही समुद्रात उडी मारली होती. त्यानंतर माझ्या आजूबाजूला बोटीवरील अनेक लोक समुद्रात पोहत होते. मदतीला आलेल्या बोटी समुद्रात समोर दिसत होत्या. आम्ही १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून समुद्रात होताे. सकाळ पाहू की नाही ही भीती होती, अखेर १७ मे रोजी सकाळी १० वाजता वेग कमी होताच, ऑफशेअर एनर्जीच्या जहाजातील लोकांनी आम्हाला वाचविले. त्यानंतर थेट हॉस्पिटलमध्ये जाग आल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद आहे. --------------------------------------------

Web Title: Holding each other's hands in the sea all night, they were shouting for help ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.