Holi 2020: घातक रासायनिक रंग टाळा; नैसर्गिक रंग वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:58 AM2020-03-09T00:58:16+5:302020-03-09T00:58:35+5:30

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची मोहिम : ट्रेन, बससह उर्वरित वाहनांवर फुगे, पाण्याच्या पिशव्या न मारण्याचे आवाहन

Holi 2020: Avoid Hazardous Chemical Colors; Use natural colors | Holi 2020: घातक रासायनिक रंग टाळा; नैसर्गिक रंग वापरा

Holi 2020: घातक रासायनिक रंग टाळा; नैसर्गिक रंग वापरा

googlenewsNext

मुंबई : रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन होळीदरम्यान नागरिकांनी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन विविध सेवाभावी संस्थांसह पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे. विशेषत: होळीसाठी झाडे तोडू नका आणि पाणी वाया घालवू नका, असेही आवाहन विविध सेवाभावी संस्थांनी केले आहे. विशेषत: नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने प्रतीकात्मक होळी साजरी करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.

बदलते हवामान, ऋतुचक्रामुळे होत असलेले बदल लक्षात घेता, सर्वांनी पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा करावा, असे आवाहन सातत्याने केले जात आहे. होळी उत्सवात रासायनिक रंगांमुळे होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे प्रमाण वाढले आहे़ नैसर्गिक रंगांची मागणीही वाढू लागली आहे. ‘होळी करा लहान; पोळी करा दान’ असा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून हाती घेण्यात आला आहे. पोळी होळीत टाकण्याऐवजी होळीला नैवेद्य दाखवा आणि तो होळीत टाकू नका, तर समितीच्या कार्यकर्त्यांना द्या, असेही समितीने म्हटले आहे. अशा पोळ्या गोळा करून गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविल्या जातील.

होळी म्हणजे दुर्गुणांचा नाश
होळीसाठी अनेकदा जिवंत झाडे तोडली जातात. हे पर्यावरणास हानिकारकच आहे. मोठी होळी बनविण्यापेक्षा, छोटी आणि प्रतीकात्मक म्हणजे, होळी म्हणजे दुर्गुणांचा नाश, असे मानत एका कागदावर आपल्याला जाणवणारे दुर्गुण लिहून तो कागद होळीत जाळावा आणि तो दुर्गुण नष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असाही संदेश अंनिसने दिला आहे.

झाडे तोडली तर गुन्हा
सार्वजनिक परिसरातील झाडांसह एखाद्या सोसायटी किंवा खासगी आवारातील झाड तोडल्याचे किंवा झाड छाटल्याचे आढळून आल्यास, संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात होळी साजरी केली जात असतानाच, रस्त्यावरून धावत असलेल्या बेस्ट बस, खासगी बस, उर्वरित खासगी वाहने आणि टेÑनवर फुगे, पाण्याने भरलेल्या पिशव्या मारल्या जातात. वेगाने फेकल्या, मारल्या जात असलेल्या फुग्या, पिशव्यांमुळे इजा होण्याची भीती असते. अशी कृत्ये करत रंगाचा बेरंग करू नये, असेही आवाहन केले जात आहे.

मुंबईकरांनो, हे करा
होळीसाठी झाडे तोडू नका.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगांनी होळी/रंगपंचमी खेळा.
अनेक ठिकाणी होळी पेटविण्याऐवजी एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी पेटवा.
अपशब्द उच्चारू नका.
होळीमध्ये प्लास्टीक, टायरसारख्या हानिकारक वस्तू जाळू नका.

Web Title: Holi 2020: Avoid Hazardous Chemical Colors; Use natural colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी