शिमग्यात ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीची ‘बोंब’; मुंबई ते कोकण बसभाडे ३० ते ५० टक्क्यांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 07:09 IST2025-03-06T07:07:05+5:302025-03-06T07:09:44+5:30
एसटी आणि रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, एसटीकडे गाड्या कमी आहेत. त्यामुळे वाढीव मागणी पूर्ण होत नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय नसतो.

शिमग्यात ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीची ‘बोंब’; मुंबई ते कोकण बसभाडे ३० ते ५० टक्क्यांनी वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतून होळीनिमित्त कोकणात आणि गुजरातला जाणाऱ्या खासगी बसच्या भाड्यात ट्रॅव्हल्सनी ८ ते १५ मार्च या कालावधीसाठी ३० ते ५० टक्के वाढ केली आहे. साध्या बसचे भाडे ७०० वरून १२०० आणि एसी बसचे भाडे दोन हजारांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
होळी आणि धूलिवंदनासाठी मुंबईतून कोकण आणि गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यावर्षी हे सण गुरुवारी आणि शुक्रवार म्हणजेच आठवड्याच्या शेवटी आल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज वाहतूकदारांनी व्यक्त केला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे बसच्या संख्येत १५ ते ३० टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे वाहतूकदारांनी सांगितले. एसटीच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडे आकारणी करण्याची परवानगी ट्रॅव्हल्सना आहे. इतर वेळी एसटीपेक्षा कमी भाडे घेतले जाते. हे नुकसान हंगामात भरून काढण्यासाठी भाडेवाढ करण्यात करण्यात येते, असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे.
एसटीकडे बसची कमतरता
एसटी आणि रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, एसटीकडे गाड्या कमी आहेत. त्यामुळे वाढीव मागणी पूर्ण होत नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय नसतो. यंदा मुंबईहून रत्नागिरीला जाण्यासाठी साध्या बसचे ११००, तर विजयदुर्गला जाण्यासाठी १३०० इतके भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच सुरतला जाणाऱ्या साध्या बसला १०००, तर अहमदाबाद १५०० भाडे आकारण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातून होळीसाठी कोकण, गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होते. त्यासाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली जाते. शासनाच्या परमिटनुसार सणासुदीच्या काळात तिकीट भाड्यामध्ये वाढ करण्यात येते. ती अनिवार्य असते. - हर्ष कोटक, जनरल सेक्रेटरी, मुंबई बस मालक संघटना