मुंबई : कोरोनाचा फटका होळीसाठीच्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. चीनमधून होणारी आयात बंद असल्याने पिचकारी, पाण्याची बंदूक, विविध खेळण्यांची किंमत वाढली आहे. गतवर्षीच्या वस्तू व आयात बंद करण्यापूर्वी आणलेल्या वस्तूंची विक्री केली जात आहे. आयात बंद झाल्याने भारतीय वस्तूंच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्या महागल्या आहेत.पन्नास रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत विविध पिचकाऱ्या, वॉटर गन, स्पायडर मॅन गिटार, पाण्याची दीड-दोन लीटरची विविध आकारांतील आकर्षक टाकी, समोरच्याने उडवलेल्या पाण्यापासून वाचण्यासाठी बाजारात आलेली छोटी छत्री असलेली बंदूक अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.मात्र चिनी मालाचा तुटवडा व भारतीय मालाची जास्त किंमत यामुळे नेहमीपेक्षा बाजारपेठेत ग्राहकांना जास्त रक्कम अदा करावी लागत आहे.भारतातून येणाºया वस्तूंमध्ये सर्वांत जास्त प्रमाण दिल्ली येथून येणाºया वस्तूंचे आहे. दिल्लीच्या नरेला भागातून या वस्तू बाजारात आल्या आहेत. होळीसाठी वापरण्यात येणारा रंग ठाणे व इतर स्थानिक बाजारपेठांतून मुंबईत आला आहे. दहा, पंधरा रुपयांच्या पाकिटापासून दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंतचे रंग सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र कोरोनाच्या दहशतीमुळे बाजारपेठेत नेहमीप्रमाणे खरेदीची गर्दी नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चिनी मालाचा दर्जा कमी असल्याने त्यांची किंमत कमी असते; मात्र भारतीय वस्तूंची किंमत जास्त असली तरी दर्जाही चिनी वस्तूंपेक्षा चांगला असतो याकडे काही विक्रेत्यांनी लक्ष वेधले.होळीसाठी ७० ते ८० टक्के वस्तू चीनमधून आयात केल्या जातात. मात्र, चीनमधून होणारी आयात बंद झाल्याचा फटका बाजारपेठेला बसत आहे. चिनी माल कमी किमतीत उपलब्ध होत असे. महाग किमतीचा फटका विक्रेत्यांना व ग्राहकांना बसत आहे.- वीरेन शाह, अध्यक्ष, रिटेल ट्रेडर्स असोसिएशन, मुंबई
चीनमधून आयात बंद झाल्याने होळीच्या वस्तूंना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 11:49 PM