- मनोहर कुंभेजकर
मुंबई: आज कोरोनाची दहशत असतांना अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापससून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याने आपली संस्कृती व परंपरा जपत येथील बाजार गल्ली व मांडवी गल्लीच्या कोळी महिलांनी सोमवारी रात्री वेसावे गावात काढलेली मटकी मिरवणुक काढली.
शिमगा अथवा होळीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण.आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. सन शिमग्याचा आला हो शिमग्याचा आला तुम्ही हावली भवती नाचा हो, हावली भवती नाचा असे गीत गात येथील बाजार गल्ली व मांडवी गल्लीच्या कोळी महिलांची हावलीला निघणारी मडकी(मटकी) मिरवणूकीला एक आगळी वेगळी पुरातन परंपरा आहे.
मुंबईतील वेसावे गावच्या होळीची मजा आणि पारंपरिक थाट काही औरच आहे. येथील हावली पाहण्यासाठी परदेशी पाहुणे आवर्जून वेसाव्यात येत असल्याने, पारंपरिक साज लाभलेल्या होळीने वेसाव्याची शान आणखी वाढली आहे. येथे गोताच्या किंवा पाटलांच्या हावलाच्या दिवशी पारंपरिक वेशभूषेत काल सोमवारी रात्री उशिरा मडकी मिरवणूक काढली जाते. ज्यात वेसावे गावातील बाजार गल्ली व मांडवी गल्ली जमातीचा सहभाग होता.
कोळी महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर रंगीत मातीचे मडके घेऊन गावात मिरवणूक काढली.तर वर्सोवा विधानसभेचया भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी देखिल येथील हावली उत्सवात सहभागी होत कोळी गीतांवर ठेका धरत येथील कोळी महिलांच्या नृत्यात त्या सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे पुरुष मंडळी विविध देवी-देवतांचे अथवा इतर सोंग घेत सादर करत अथवा गाणी म्हणत गावात या मिरवणुकीत सहभागी झाले. सुमधुर कोळीगीत वाजवणाऱ्या कोळी बँड पथकही सहभागी झाले होते. त्याचबरोबर वेसावे गावातील ९ गल्ल्या दरवर्षी मोठ्या उत्साहात होळी साजरी करतात अशी माहिती बाजार गल्ली कोळी जमातीचे अध्यक्ष पराग भावे व मांडवी गल्ली कोळी जमात संस्थेचे अध्यक्ष मनोज कासकर यांनी सांगितले.
येथील गोमा गल्लीचा हावली उत्सव देखिल नेहमीप्रमाणे मोठा होता.येथील होळीच्या अग्नीचे मानकरी श्री नितिन भगत होते.तर आज वेसावकरांनी संध्याकाळी बोटीची पूजा केली अशी माहिती या गल्लीचे अध्यक्ष रणजित काळे व देवेंद्र काळे यांनी सांगितले.तर डॉगरी गल्लीत देखिल हावली उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला अशी माहिती या गल्लीचे अध्यक्ष जयेंद्र लडगे व महेंद्र लडगे यांनी सांगितले.
शिमगा अथवा होलीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. मुळात कोळी लोकांची हावली ही १५ दिवस साजरी होते. सुरुवात होते ती गावातील लहान मुलांच्या होळीपासून. पण शेवटचे दोन दिवस होलीका दहनासाठी महत्त्वाचे मानले जातात.
होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या होळीला कोळी भाषेत कोमार/कोंबार हावली म्हटले जाते. जी गावातील तरुण पोरे साजरी करतात. होळी पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या होळीला गोताची हावली किंवा पाटलाची होळी म्हणतात. याचा मान गावचा पाटील अथवा गल्लीच्या अध्यक्षाला असतो. होळी पेटवताना बोंबा मारण्याची परंपरा पाहायला मिळते. रात्री १२ ते १ च्या सुमारास होळीभोवती मडकी रचून, प्रदक्षिणा घालत वाजतगाजत होळी पेटवली गेली असे राजहंस टपके आणि प्रवीण भावे यांनी सांगितले.
कोळ्यांचा डांडीया रास ----- म्हणजेच पारंपारीक डांगर्या ! नवरात्रीत आपण गरबा, डांडीया असा गुजरातेतला पारंपारीक नाच पाहिलाच असेल... पण मंडळी जसा गुजरातचा गरबा अथवा मध्य प्रदेशचा डांडीया प्रसिद्ध आहे तसाच डांडीयाचा प्रकार कोळी समाजात देखील पहायला मिळतो.कोळी बोली भाषेत त्या पारंपारीक न्रुत्य प्रकाराला "डांगर्या" असे म्हणतात. पण हे डांगर्या कोळी बांधव खेळतात ते शिमगा अथवा हावली (होळी) च्या सणाला अशी माहिती वेसावा कोळीवाड्यातील मोहित रामले यांनी दिली.
कोळीवाड्यात पूर्वी शिमग्याला गल्लो गल्लीत "टिमखे बाजा, घुमट"* वाजत व त्या जोडीला विशिष्ट नाच पहायला मिळत तो म्हणजे डांगर्यांचा. कोळी बांधव -- खासकरून कोळनी महिला हातात डांड्या घेऊन, *"जोय जा अरे सोय जा, रावणाची नजर हाय सीतेवरी न सीतेची नजर हाय रामावरी, आंब्याची डांगली चिंचेवरी न चिंचेची डांगली आंब्यावरी."असे गमतीशीर पारंपारीक कोळीगीत गात एकमेकींच्या हातातील डांगर्यांवर (डांडीयांवर) मारीत. आणि मग हावलाय (होळी) भवती गोलाकार फिरत डांगर्या मारत आनंद व्यक्त करीत.आजही मुंबईतील मनोरी, मालवणी, एक्सर, वजीरा या विविध कोळीवाड्यांमध्ये होळीच्या दिवसात म्हणजे विशेशकरून कोंबार हावली (कुमारांची होळी) व गोताची अथवा पाटलाची हावली (होळी पोर्णिमा) या दिवसात डांगर्या मारण्याचा नृत्य पहायला मिळते..मनोरी गावात देखील डांगर्या खेळताना कोळी महिला,"हावलय चंदन बागेन उभी गो हावलय चंदन बागेन उभी" असे होळीका स्तुतीचे गीत म्हणतात अशी माहिती.मोहित रामले याने शेवटी दिली.