होळी पौर्णिमा - रंगांचा उत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:05 AM2021-03-27T04:05:58+5:302021-03-27T04:05:58+5:30

- दा. कृ. सोमण या वर्षी रविवार, दि. २८ मार्च रोजी हुताशनी पौर्णिमा असून, सोमवार, दि. २९ मार्च रोजी ...

Holi Pournima - A celebration of colors! | होळी पौर्णिमा - रंगांचा उत्सव!

होळी पौर्णिमा - रंगांचा उत्सव!

Next

- दा. कृ. सोमण

या वर्षी रविवार, दि. २८ मार्च रोजी हुताशनी पौर्णिमा असून, सोमवार, दि. २९ मार्च रोजी धूलिवंदन आहे. कोरोनामुळे या वर्षी होळी पौर्णिमेचा सार्वजनिक रंगोत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही. तसा तो साजरा केला नाही, तरी धार्मिकदृष्ट्या काहीही हरकत नाही.

.......................................

होलिकोत्सवाची प्रथा का व कशी सुरू झाली याची माहिती आपण करून घेतली की, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. गणपती किंवा नवरात्रौत्सवासारखा हा उत्सव पूजा करून घरात साजरा करायचा नसतो, तर तो घराबाहेर साजरा करायचा असतो. कोरोनामुळे उत्सवासाठी घराबाहेर पडणे हे तर फार धोकादायक झाले आहे. होलिकोत्सव सण हा मनातील विकृत भावना दूर करून मन पवित्र व आनंदी करण्यासाठी असतो, तर थंडीमध्ये काही वृक्षांची पानगळ होते, ती एकत्र करून जाळून परिसर स्वच्छ ठेवून उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी साजरा करायचा असतो.

उत्तर भारतात या सणाला ‘होरी-दोलायात्रा’ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘कामदहन’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘होळी’ किंवा ‘शिमगा’ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण - गोमंतकात या सणाला ‘शिग्मा’ किंवा ‘शिग्मो’ असे म्हणतात.

श्री. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ’ म्हणजे ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘शिग्मा’ हा शब्द रूढ झाला. त्यानंतर त्याचे ‘शिमगा’ असे रूप रूढ झाले आहे.

होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. कृष्ण लहान असताना, त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पुतना राक्षसीला पाठविले; पण दूध पीत असताना, तिचा प्राण शोषून कृष्णाने त्या दुष्ट पुतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. त्याचे प्रतीक म्हणून होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पुतना राक्षसीला जाळण्यात येते. महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षशीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही, असा समज आहे.

आता यामागचे विज्ञान काय आहे, ते पाहू या. होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसांत येतो. या दिवसांत अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली. स्वच्छता झाली की, रोगराईची ढुंढा राक्षशीण मुलांना त्रास देत नाही. त्या काळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे.

अस्वच्छता राक्षशीण

कोरोना व्हायरसच्या भीतीने सध्या मंदिरात स्वच्छता ठेवली जात आहे. हे पाहून बरे वाटले. खरे म्हणजे ईश्वर हा मंदिरात आहे, अशी भाविकांची श्रद्धा असते. मग, नेहमीच मंदिरे स्वच्छ ठेवायला नकोत का? प्रत्येक मंदिर हे स्वच्छ व पवित्र असावयास हवे. भक्तांनी दिलेले दान हे मंदिरासाठीच असते. मग, ही स्वच्छता बारा महिने, चोवीस तास असावयाला नको का? कचरा आपण टाकायचा आणि नगरपालिका व प्रशासनाने तो स्वच्छ करायचा, अशी सवयच काही लोकांना लागली आहे. आपण लोकांनीच कचरा परिसरात टाकला नाही, तर परिसर आपोआपच स्वच्छ राहणार नाही का? कोरोना व्हायरसच्या भीतीने का होईना मंदिर व्यवस्थापकांना आणि लोकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटेल आणि तशी सवय लागेल, अशी आशा आहे.

आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण हस्तांदोलन करीत नाही. हात जोडून नमस्कार करतो. आज संपूर्ण जगाला या गोष्टीचे महत्त्व पटले आहे.

आपला देश गरीब आहे, लोकसंख्या जास्त आहे. म्हणून आपल्या देशात स्वच्छतेची सवय नाही, असे काही जण म्हणतात; पण तेही कारण खरे नाही. कारण यासाठी केवळ पैशांची जरुरी नाही, तर जरुरी आहे, ती इच्छाशक्तीची आणि सवयीची! सरकारी, सार्वजनिक किंवा मंदिराची जागा ही प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. ती स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपलीही आहे, ही भावना असणे जरुरीचे आहे.

होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे; पण तो केमिकल, हानिकारक रंगांचा नाही, तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी राहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र राहावं यासाठी हा सण येत असतो.

वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूमध्ये विविध प्रकारची फुले विविध रंगांची उधळण करीत असतात, तर काही वृक्ष नवीन पालवीने नटलेले असतात. कोकिळेचा आवाज निसर्गाचे माधुर्य अधिकच गोड करीत असतो. म्हणूनच वसंत ऋतूला ‘ऋतूंचा राजा’ असे म्हटले जाते. १८ फेब्रुवारी रोजी सूर्याने सायन मीन राशीत प्रवेश केला. त्या दिवसापासूनच वसंत ऋतू सुरू झाला.

सण-उत्सव पर्यावरण रक्षणासाठी

‘होळी जळाली, थंडी पळाली’ असे म्हटले जाते; परंतु या वर्षी थंडी केव्हाच पळाली. या वर्षी तशी थंडी कमीच होती. हवामानात होणारा हा असा बदल चांगला नाही. पिकांसाठी आणि माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. निसर्गात होणाऱ्या या बदलाला अर्थात आपणच कारणीभूत आहोत. आपण जर निसर्गाला जपले नाही, तर निसर्ग आपणास जपणार नाही. म्हणूनच पर्यावरणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे होळीचा सण साजरा करीत असताना वृक्षतोड होणार नाही याकडे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपले सण-उत्सव पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. भक्षण करण्यासाठी नसतात.

या वर्षी कोरोनामुळे हा सण आपण संयमाने साजरा करीत आहोत. सर्व नियम पाळून सण-उत्सव साजरे करण्याची आता आपणास सवयच लागली आहे. कोरोनावर लस आल्यामुळे कोरोनावर लवकरच आपण विजय मिळवू शकू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षड्रिपूंवर आपण नियंत्रण मिळवून जीवन सुखी व समृद्ध करण्याचा प्रयत्न करू या. होळीच्या या रंगोत्सवानिमित्त तुम्हाला उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

(लेखक पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक आहेत.)

Web Title: Holi Pournima - A celebration of colors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.