काठ्यांच्या आधाराची ‘होळी’
By admin | Published: March 11, 2017 08:24 PM2017-03-11T20:24:38+5:302017-03-11T20:28:17+5:30
सं गमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा होतो.
सं गमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा होतो. या गावात शिमगोत्सवात उभा केला जाणारा होळीचा माड हा कोणत्याही आधाराशिवाय केवळ उपस्थित असणारे गावकरी आपल्या हातातील काठ्यांच्या आधारे उभा करतात. हे पाहण्यासाठी परिसरातील हजारो ग्रामस्थ येथे गर्दी करतात.
कडवई गावची ग्रामदेवता म्हणजे वरदानदेवी. या ग्रामदेवता मंदिरात शिमगोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी गावची जत्रा सुरू होते. या दिवशी रात्री ग्रामदेवता मंदिराच्या आवारात फार मोठी जत्रा भरते. यावेळी रात्री गावातून तोडून आणलेले माडाचे झाड हे देवाच्या सहाणेजवळ आणून काठ्यांच्या आधारावर उभे केले जाते. तसेच होळीचा होम पहाटे लावला जातो. तसेच धुलिवंदनाच्या दिवशीही यात्रा चालूच असते. या दिवशी परिसरातील गावांतून हजारो ग्रामस्थ ही यात्रा पाहण्यासाठी येतात. यावेळी दुपारी यात्रेचा माड उभा केला जातो व होमाने यात्रेची सांगता होते. यानंतर देवीची पालखी सहाणेवर विसावते. दुसऱ्या दिवशी ही पालखी शिंदेआंबेरी येथे वरदान देवीची बहीण असणाऱ्या चंडिका देवीच्या भेटीला जाते. हा भेट सोहळा पाहण्यासारखा असतो.
यावेळी दोन्ही पालख्यांमधील नारळांची अदलाबदल होते, अशी आख्यायिका आहे. या दोन बहिणी वर्षातून एकदाच भेटत असतात. मात्र, ही काही मिनिटांची भेट पाहताना उपस्थित गावकरी, भाविक भारावून जातात, इतका हा भेट सोहळा अविस्मरणीय असतो.
अन्य कोणत्याही आधाराशिवाय केवळ काठीच्या आधारावर होळीचा माड उभा करतानाचे दृष्य फारच रोमांचकारी असते. गावकऱ्यांच्या हातातील काठीच्या सहाय्याने माड उभा करताना त्यांची होणारी कसरत उपस्थित साऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडते. यावेळी गावकऱ्यांच्या एकीचे दर्शनच सर्वांना घडून येते. गावकऱ्यांच्या एकीमुळेच केवळ काठीच्या सहाय्याने हा माड उभा केला जातो. हा माड पहिल्याच प्रयत्नात काही सेकंदात उभा केला जातो. एवढे मोठे झाड (माड) हे केवळ देवीच्या श्रध्देमुळेच उभे होऊ शकते, अशी येथील ग्रामस्थांची आजही श्रद्धा आहे. अशाप्रकारचा शिमगोत्सव हा इतर कुठेही पाहायला मिळत नसल्याने हा शिमगोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
मिलिंद चव्हाण, आरवली