Join us

‘हॉलीडेज’चे लूट‘पर्यटन’!

By admin | Published: March 30, 2016 2:00 AM

संपूर्ण आयुष्य पैसे कमावून निवृत्तीनंतर जोडीदारासोबत परदेशात फिरण्याची हौस बाळगणाऱ्या वृद्धांना टार्गेट करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, कमी पैशांत

- मनीषा म्हात्रे,  मुंबईसंपूर्ण आयुष्य पैसे कमावून निवृत्तीनंतर जोडीदारासोबत परदेशात फिरण्याची हौस बाळगणाऱ्या वृद्धांना टार्गेट करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, कमी पैशांत परदेशवारीचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला भांडुप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जीवन सोमनाथ खरात (४१) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याने आत्तापर्यंत ३० ते ४० वृद्धांना गंडा घातल्याचे समजते.फसवणूक झालेल्या एका वृद्धाच्या कहाणीने तर पोलिसही चकीत झाले आहेत. मालाड परिसरात ७० वर्षीय अशोक नागवेकर हे पत्नी मायासोबत राहतात. खासगी कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर पत्नीला परदेश वारी घडविण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार, आयुष्यभर जमा केलेल्या पुंजीतून त्यांनी पत्नी व नातेवाईकांसह दुबईला जाण्याचे ठरविले. दैनिकांमध्ये खरातच्या ‘अनिरुद्ध हॉलीडेज’ची जाहिरात वाचून त्यांनी त्याची भेट घेतली. अन्य पॅकेजच्या तुलनेत कमी पैशांत दुबईवारी होत असल्याने नागवेकर त्याच्या आमिषाला भुलले. ११ मे २०१५ ला दुबईला जाण्याची तारीख ठरली. सुरुवातीला पाच जणांचे प्रत्येकी ५० हजार रुपये त्याला देण्यात आले. दुबईवारीसाठी त्यांनी स्वप्न रंगवले. तयारी झाली असतानाच, आदल्या दिवशीच खरातने ट्रिप रद्द झाल्याचे सांगितले. सगळ््यांच्याच पदरी निराशा पडली. त्यानंतर, नागवेकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडून पैसे परत देण्याचा तगादा लावला. मात्र, कारणे सांगून तो टाळाटाळ करू लागला. त्यांच्याकडून मिळालेले चेकही बाउन्स झाले. अशा प्रकारे वर्ष उलटूनही खरातकडून पैसे मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने, त्यांनी १० मार्च रोजी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी नितीन गिजे यांनी याचा अधिक तपास सुरू केला. खरातने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याच्या तक्रारी समोर आल्या. पेडणेकर यांच्यासह तब्बल ९ वृद्धांना सिंगापूर, थायलंड, मलेशिया ट्रिपच्या नावाखाली प्रत्येकी ९५ हजार उकळल्याचे उघड झाले. याचे गांभीर्य लक्षात घेत, गिजे यांच्या तपास पथकाने खरातच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील तब्बल ३० ते ४० ज्येष्ठ नागरिकांना त्याने अशा प्रकारे गंडा घातला आहे.तीन महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या चकरादुबईला जाण्याचे आकर्षण असल्याने मालाडचे उमेश पेडणेकर हेही खरातच्या आमिषाला बळी पडले. दुबई, अबुधाबीच्या पाच दिवसांच्या पॅकेजमध्ये तेथील नातेवाईकांनाही भेटून देण्याचे स्वप्न खरातने त्यांना दाखवले. मात्र, यामध्ये आपली फसवणूक झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेलो. पोलिसांनी सुरुवातीला दाद दिली नसल्याने उमेश पेडणेकर यांनी सांगितले. तब्बल तीन महिने मालाड पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र, आज-उद्या पैसे परत करतो, असे सांगून खरात दिवस ढकलत होता. वर्षभर याचा पाठपुरावा केल्यानंतर, अखेर भांडुप पोलिसांनी दखल घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे.कठोर कारवाई होणे गरजेचेज्येष्ठांची फसवणूक करणाऱ्या अशा ठगांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे तक्रारदार माया नागवेकर यांचे म्हणणे आहे. पर्यटनासाठी जाताना असे दावे करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.अशी करायचा फसवणूकजीवन खरात याने २०१० मध्ये भांडुप पश्चिमेकडील ड्रीम्स मॉलमध्ये ‘अनिरुद्ध हॉलीडेज’ सुरू केले. ज्येष्ठ नागरिक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पर्यटनासाठी पूर्ण पैसे खर्च करण्याच्या तयारीत असतात. त्यामुळे त्याने ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले. कमी पैशात परदेश वारीचे स्वप्न दाखवायचे. पैसे आणि इतर व्यवहार पूर्ण होताच ट्रिपच्या आदल्या दिवशी ट्रिप रद्द करून फसवणूक करणे. पैसे परत मिळविण्यासाठी ज्येष्ठांना कोर्टाच्या पायऱ्या झिजविण्यास भाग पाडणे, अशी त्याची मोडस आॅपेरंडी होती. त्याच्याविरुद्ध बोरीवली, अंधेरी, ठाणे, आणि सेशन कोर्टात चेक बाउन्सप्रकरणी खटला सुरू आहे.पर्यटनासाठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स निवडताना त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर कोणी तुमची फसवणूक करत असेल, तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.- नितीन गिजे, तपास अधिकारी