Join us

अनंत-राधिकाच्या विवाहात हॅालिवूडचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 12:21 AM

या वर्षाच्या सुरुवातीला अनंत-राधिकाचा पहिला लग्न पूर्व सोहळा जामनगरमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

 

मुंबई - अलीकडच्या काळातील सर्वात मोठा शाही सोहळा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नालाही प्री-वेडींग सेरेमनीप्रमाणे हॅालीवूडच्या कलाकारांचा तडका देण्यात येणार आहे. ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे या परदेशी गायक-कलाकारांचा जलवा या सोहळ्यात अनुभवायला मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला अनंत-राधिकाचा पहिला लग्न पूर्व सोहळा जामनगरमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न झाला. रिहाना, अकोन, दिलजीत दोसांज, लकी अली, अरिजीत सिंग, प्रीतम आणि श्रेया घोषाल यांच्या परफॉर्मंसने हा सोहळा संस्मरणीय बनवला. यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. दुसरा प्री-वेडींग सोहळा दक्षिण फ्रान्समध्ये क्रूझवर रंगला. या चार दिवसीय सोहळ्यात केटी पेरी, अँड्रिया बोसेली, पिटबुल, गुरु रंधावा आणि बॅकस्ट्रीट बॉईज यांचा जलवा पाहायला मिळाला. पहिल्या सोहळ्याच्या तुलनेत दुसऱ्या सोहळ्यावर कितीतरी जास्त पटीने खर्च करण्यात आला होता. या सोहळ्याला शाहरुख खान, रणवीर सिंग, जान्हवी कपूर, करीना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. १२ जुलैला अनंत-राधिका खऱ्या अर्थाने विवाह बंधनात अडकणार आहेत.

यासाठी मुंबईमध्ये तीन दिवसीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिल्या दिवशी 'शुभ विवाह', दुसऱ्या दिवशी 'शुभ आशिर्वाद' आणि तिसऱ्या दिवशी 'मंगल उत्सव' असे कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यामध्ये ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे या गायक-कलाकारांचा परफॅार्मंस वऱ्हाडी मंडळींसाठी खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, मुख्य आकर्षण असेल. मिळालेल्या माहितीनुसार अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यात अनोखे रंग भरण्यासाठी ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे तीन दिवस मुंबई मुक्कामी असणार आहेत. यांच्या परफॉर्मंसवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार असला तरी एकूण आकडा समजू शकलेला नाही. शेकडो डॉलर्सची तिकीटे असणाऱ्या या कलाकारांचा  परफाँर्मंस पाहुण्यांना अगदी मोफत लुटता येणार आहे.

उत्तर लंडनमध्ये जन्मलेली अ‍ॅडेल लॉरी ब्लू अ‍ॅडकिन्स ही कवयित्री-गायिका अ‍ॅडेल या एकेरी नावाने लोकप्रिय आहे. बीबीसी साउंड ऑफ २००८ या पुरस्कारासोबतच तिने ग्रॅमी पुऱस्कारही आपल्या नावे केले आहेत. '२१' या अल्बममुळे अ‍ॅडेलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये विविध विक्रमांसाठी नोंद करण्यात आली.

मूळचा टोरंटोतील ओंटारियोचा असलेल्या कॅनेडियन रॅपर, गायक आणि अभिनेता ऑब्रे ड्रेक ग्रॅहम हिप हॉप प्रेमींमध्ये पॉप्युलर आहे. 'डीग्रासी : द नेक्स्ट जनरेशन' या मालिकेतील जिमी ब्रूक्सच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. संगीतासाठी ओळखला जाणाऱ्या ड्रेकचे नाव काही वेळा वाद आणि भांडणांमुळेही चर्चेत राहिले आहे.

अमेरिकन कवयित्री-गायिका असलेली एलिझाबेथ वूलरिज ग्रँट हि लाना डेल रे म्हणून ओळखली जाते. पॉप संगीतातील हे एक लोकप्रिय नाव आहे. ११ ग्रॅमी आणि गोल्डन ग्लोब अवॉर्डसाठी नामांकनांसोबतच तिने एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड, दोन ब्रिट ॲवॉर्डस, दोन बिलबोर्ड वूमन इन म्युझिक ॲवॉर्डसह विविध पुरस्कार पटकावले आहेत.

 

टॅग्स :अनंत अंबानी